पान:Sahyadrichi Aart Haak Dr. Madhav Gadgil 22nd May 2023.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आणल्या. आजही पश्चिम घाटावर अशा शतावधी औषधी वनस्पती लोकपरंपरांतून वापरात आहेत, त्यांचे नव-नवे व्यापारी उपयोग शोधले जात आहेत. अशा ज्ञानाचा वापर केला गेल्यास लोकांना त्यातून न्याय्य लाभांश मिळावा असा आंतरराष्ट्रीय जैवविविधता करारनाम्याचा व भारताच्या जैवविविधता कायद्याचा एक उद्देश आहे. असे प्रत्यक्षात घडल्याचे एकच उदाहरण आहे, ते म्हणजे काणी या केरळातील आदिवासी समाजाच्या 'आरोग्यपच्या' (ट्रायकोपस झेलानिकस) या वनस्पतीच्या थकवा टाळण्याच्या गुणधर्माच्या ज्ञानाचा उपयोग हे ज्ञान काणी लोकांकडून 'ट्रॉपिकल बॉटेनिकल गार्डन व रिसर्च इन्स्टिट्यूट (टीबीजीआर) या संस्थेच्या शास्त्रज्ञांना मिळाल्यावर त्यांनी यावर अधिक संशोधन करून 'जीवनी' नावाचे एक टॉनिक बनवले. 'कोट्टकल आर्यवैद्यशाळा' या उद्यमाने हे बनवण्याच्या हक्काच्या मोबदल्यात 'टीबीजीआर'ला दहा लक्ष रुपये ठोक दिले. त्या संस्थेने यातील पाच लक्ष रुपये काणी लोकांचा एक विश्वस्त निधी स्थापून त्यांच्या हवाली केले. ट्रायकोपस झेलानिकस आंतरराष्ट्रीय जैवविविधता समझोत्याचे मूळ आहे व्यापारी हितसंबंधांत. आधुनिक जीवतंत्रज्ञानामुळे कोळी आणि कोळिष्टकांसारख्या अगदी टाकाऊ वाटणाऱ्या चीजाही महत्त्वाच्या ठरत आहेत. कोळिष्टकांचे धागे तेवढ्याच आकाराच्या पोलादाच्या धाग्याहूनही बळकट असतात. कोळ्यांची पैदास करणे अवघड आहे; पण आज कोळ्यांच्या अंगातले धागा बनवणारे जनुक उचलून दुसऱ्या एखाद्या जीवात बसवून कोळ्यांच्या धाग्याचे रेशमासारखे मोठ्या प्रमाणात उत्पादन करणे शक्य झाले आहे. सह्याद्रीची आर्त हाक! १५