पान:Sahyadrichi Aart Haak Dr. Madhav Gadgil 22nd May 2023.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मिरीचा वेल लागवडीखाली आणलेल्या अनेक वनस्पतींचे वन्य भाईबंद हा भारताच्या जीवसंपत्तीतील एक विशेष लक्षणीय भाग आहे आणि कारवार-गोवा-बेळगाव- कोल्हापूर - सिंधुदुर्ग हा टापू अशा वनस्पतींचे जगातील सर्वात समृद्ध आगर आहे. इथे मिरी-वेलदोडा-दालचिनी जायपत्री अशा मसाल्यांच्या वनस्पती, कोकम- आंबा-फणस अशी फळझाडे, अळकुड्या सुरणासारखी कंदमुळे, भात- तूर-मूग - चवळी - तीळ-हळद अशी पिके अशा नानाविध वनस्पतींचे वन्य पूर्वज व नातेवाईक मोठ्या प्रमाणात आढळतात. पिकांच्या सुधारलेल्या वाणांची गुणवत्ता सुधारण्यासाठी निरंतर नव-नवे जनुक हुडकावे लागतात. असे अनेक जनुक त्यांच्या वन्य भाईबंदांतून मिळू शकतात. ह्यातून आपण स्वतः सुधारित वाण निर्माण करूच शकतो; पण परकीयांनी ही भारताची सार्वभौम मालमत्ता वापरल्यास आपल्याला अनेक पद्धतीचे लाभ होऊ शकतात. शिवाय पश्चिम घाट औषधी वनस्पतींचा खजिना आहे. फिरंगी भारताकडे आकर्षित झाले ते मसाले आणि औषधी वनस्पतींमुळे. आधुनिक वनस्पतीशास्त्राच्या आदिग्रंथांपैकी एकाचे नाव आहे- हॉर्टस मलबारिकस. बारा खंडांत रचलेला औषधी वनस्पतींची सचित्र वर्णने देणारा हा लॅटिन भाषेतील ग्रंथ केरळातील कोचीच्या डच राज्यपालाने १६७८-१६९३ ह्या कालखंडात प्रसिद्ध केला. मुळात तो इटी अच्युतन, अप्पु भट, रंगा भट व विनायक पंडित या चार वैद्यांनी मल्याळम व कोंकणी भाषांत लिहिला होता. लोकांचे जगभरचे औषधी वनस्पतींचे ज्ञान युरोपीय विज्ञानाने अशा पद्धतींनी संकलित केले व त्याच्या आधारावर अनेक औषधी उपयोगात, व्यापारात सह्याद्रीची आर्त हाक!