पान:Sahyadrichi Aart Haak Dr. Madhav Gadgil 22nd May 2023.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्लेंडर लो तेव्हा काळजी घेतली तर आपण सगळीकडे निसर्ग खूप छान राखू शकतो आणि जोडीने वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादक, आर्थिक व्यवहारही चालवू शकतो. जर्मनी, नॉर्वे, स्वीडन, फिन्लंडमध्ये हे चालते आणि आपल्याकडेही शिस्तीत, संयमाने, विवेकाने वागायचे ठरवले तर पूर्णपणे साध्य आहे. पण दुर्दैवाने आपण बेशिस्तीत, बेसुमार हव्यासाने सगळे करायचा वसा घेतला आहे ना! जेव्हा कोकण रेल्वेचे काम चालले होते, तेव्हा मला जैवविविधता राखण्यासाठी काय करावे ह्याचा सल्ला देण्यासाठी पाचारण करण्यात आले. मी अनेक गोष्टी सुचवल्या त्या सहज अंमलात आणून निसर्गाची हानी अनेक प्रकारे टाळता आली असती. एकच उदाहरण देतो- गोव्यात करमळीच्या पाणपक्ष्यांनी गजबलेल्या तलावाला रेल्वे मार्गात छोटेसे बदल करून वाचवता आले असते; पण अशा सगळ्या सूचनांना केराची टोपली दाखवण्यात आली. वर माझे नाव वापरून मी असे काही सुचवलेच नाही असे खोटे-नाटे नाटक करण्यात आले. आज करमळीच्या तलावाची दुर्दशा पाहिल्यावर माझ्या डोळ्यात पाणी येते. माझे एक भूगर्भशास्त्रज्ञ स्नेही सांगत होते की त्यांनाही असाच अनुभव आला. त्यांच्याही सर्व सूचना धुडकवण्यात आल्या. त्यामुळे आज पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर मोठ्या १२ सह्याद्रीची आर्त हाक!