पान:Sahyadrichi Aart Haak Dr. Madhav Gadgil 22nd May 2023.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काम करत आहेत. पूर्वीचे निस्तार हक्क असलेल्या मध्य भारतातील अनेक भागांत लोक जंगल संभाळून आहेत. ओरिसात मोठ्या प्रमाणावर सामूहिक वन संरक्षणातून जंगलाचे पुनरुज्जीवन झाले आहे. ह्या उलट वन विभागाच्या अखत्यारीत भीमाशंकरच्या परिसरात पवनचक्क्यांच्या माध्यमातून सुरू आहे तशी निसर्गाची भरपूर नासाडी जिकडे तिकडे चालू आहे. वर हेही लक्षात ठेवण्याजोगे आहे की स्वित्झर्लंडची केवळ गेल्या दीडशे वर्षांत फोफावलेली विपुल वनराजी सर्वतः गावसमाजांच्या मालकीची आहे. अखेर परिसर सुस्थितीत राखून खरा लाभ होतो स्थानिक लोकांना. आसमंताचे जतन, संगोपन करण्याची खरी कुवत असते स्थानिक लोकांपाशी. स्थानिक परिसराच्या व्यवस्थापनाला आवश्यक अशी बारकाव्याची माहितीपण असते स्थानिक लोकांपाशीच. तेव्हा जसा विकासाची दिशा ठरवण्यात लोकांचा सहभाग हवा, तसाच निसर्ग रक्षणातही.

एवंच, 'विकास' आणि 'पर्यावरणाचे संरक्षण' परस्परविरोधी आहेत, तसेच लोक हेच निसर्गाचे शत्रू आहेत, अशी धादांत चुकीची, फसवी मांडणी गृहीत धरून आज विकास आणि निसर्ग रक्षण हे दोन्हीही लोकांवर लादले जात आहे. त्यातून राखीव जंगले, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने ह्यांत तेवढा निसर्ग राखू या, ह्यांच्या बाहेर वाटेल तसा विध्वंस करणे समर्थनीय आहे अशी भूमिका घेतली जाते आहे. पण परिसर विज्ञान सांगते की अशा अगदी मर्यादित आश्रयस्थानांत जैवविविधता कदाचित थोडा काळ टिकेल, पण ते क्षणभंगुर ठरेल. जैवविविधतेचे चिरंतन जतन करायचे असेल तर जीवावासांच्यात सलगता हवी. म्हणजे सर्वत्र अगदी राष्ट्रीय उद्यानांसारखी पूर्ण संरक्षण दिलेली मोठ-मोठी आश्रयस्थाने हवीतच असे नाही, पण अशा आश्रयस्थानांच्या जवळपास निसर्गाला अनुकूल असे हर तऱ्हेचे निवारे हवेत. आपल्या परंपरेत सर्वत्र फैलावलेली वड, पिंपळ, उंबर, नांदुर्कीची वृक्षराजी असे आसरे पुरवण्याचा एक मार्ग होता. मी बेंगलूरूच्या 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये तीन तपे होतो. आमचे संचालक म्हणाले तू इथे शहराच्या मध्यात जैवविविधतेला अनुकूल परिसर निर्माण करायचा प्रयत्न कर. आज ते आवार हिरवेगार आहे, एवढेच नाही तर त्यात एक तीन एकरांची दाट राई निर्माण केली आहे. तिच्यात आज इतरत्र दुर्मीळ झालेल्या स्लेन्डर लोरिस ह्या मर्कटकुलातील वैशिष्ट्यपूर्ण प्रजातीचे अनेक पशू तगून आहेत. सह्याद्रीची आर्त हाक!