पान:Sahyadrichi Aart Haak Dr. Madhav Gadgil 22nd May 2023.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करणारा शाह आयोग म्हणतो तसा तीनशे पन्नास अब्ज रुपयांचा गैरव्यहार केलाच पाहिजे. ते खनिज मातीमोलाने चीनला विकलेच पाहिजे. या उपर चीनला खूप पैसे देऊन आपण पोलाद विकत आणलेच पाहिजे, अशा तऱ्हेचे प्रतिपादन केले जाते. कोण शहाणा हे सगळे मान्य करेल? आपल्याला पोलाद हवे हे खरे. पण ते उपलब्ध करण्याची प्रक्रिया कशी असावी याचा सारासार विज्ञानाधिष्ठित विचार करायला हवा. एका निकोप, निसर्गाला निष्कारण धक्का न पोहोचवणाऱ्या लोकांना न्याय देत चालवलेल्या प्रक्रियेतून ते निर्माण करायला हवे. सुकर्मातून घडवायला हवे, दुष्कर्मातून नव्हे. आमच्या पश्चिम घाट परिसर तज्ज्ञ गटाच्या अहवालाचा रोख विकास रोखण्यावर नाही, विकासासाठी आवश्यक ती निर्मिती सुकर्मातून कशी करता येईल याकडे लोकांना विचारप्रवृत्त करण्यावर आहे. आपल्याला सदसद्विवेकबुद्धीने वागणारा विश्वकर्मा हवा, अत्याचारी दुश्शासन नको, एवढाच आमचा निष्कर्ष आहे. विकासच नको असे बिलकुलच नाही! विकासाच्या बहाण्याने आज सह्याचलेचा हिरवा शालू फेडला जातो आहे. लोकशाहीच्या भीमानेच ह्या दुष्कर्मी दुश्शासनाला वठणीवर आणले पाहिजे!

आज 'विकास' आणि 'पर्यावरणाचे संरक्षण' परस्परविरोधी आहेत, विकास हवा असला तर पर्यावरणाची नासाडी होणारच होणार असे भ्रामक, किंबहुना खोडसाळ चित्र निर्माण केले जाते. ह्यामागे एवढेच आहे की तथाकथित विकास करताना, उदाहरणार्थ, बेदरकारपणे पवनचक्क्यांसाठी डोंगर रस्ते बनवताना दरडी कोसळू देणे, ओढे-नाले बुजवून टाकणे, शेतांवर राडारोडा पसरू देणे, अशा गैरप्रकारांतून उद्योजकांचा आधीच भरपूर मिळणारा फायदा आणखीच वाढतो. अशा पैशाच्या लोभाने विकासासाठी विध्वंस अटळ आहे असा बहाणा केला जातो; परंतु आज जगात औद्योगिक विकासात सह्याद्रीची आर्त हाक! ९