पान:Sahyadrichi Aart Haak Dr. Madhav Gadgil 22nd May 2023.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

'सह्याद्री' अथवा 'सह्याचल' म्हणतात. शृंगार रसराज कालिदास या गिरिराजीला एका सुंदर युवतीची उपमा देतो. ही सह्याचला उत्तरेकडे पाय करून उजव्या कुशीवर पहुडली आहे. नीलगिरी आणि आणेमलय आहेत तिचे चंदनाचा लेप दिलेले उरोज. खरेच, या दोनही पर्वतश्रेणींच्या पूर्व उतारांवर भरपूर चंदन आहे. कारवार-गोवा - सिंधुदुर्ग आहे तिचा समुद्राला भिडलेला कटि-नितंब प्रदेश. आज भ्रष्ट, निकम्मा राज्यव्यवस्थेच्या दुश्शासनाने या सह्याचलेचा हिरवा शालू पार फाडून फेडून तिची दुर्दशा केली आहे. कोणताही कृष्ण तिला हरितवस्त्रे पुरवायला उभा नाही. तेव्हा या दुश्शासनाला नेस्तनाबूत करायला लोकशक्तिरूपी भीमच पाहिजे! ह्यासाठी, आपण साच्या सह्यप्रेमींनी, विंदा करंदीकरांच्या शब्दांत, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घेतली पाहिजे! पर्यावरण आणि विकास महाभारतात दुश्शासन आहे, तसाच विश्वकर्माही आहे. विश्वकर्मा देवांचा महान शिल्पशास्त्रज्ञ होता. याने विष्णूचे सुदर्शनचक्र, शिवाचा त्रिशूळ, इंद्राचे वज्र निर्माण केले; द्वारकानगरी, लंका, हस्तिनापूर व इंद्रप्रस्थ उभारली; रथ, विमाने, आभूषणे बनवली. एवंच विश्वकर्मा हा मानव निर्मित सृष्टी घडवणारा, आदिम यांत्रिक विकासप्रक्रियेत मानव अशी निर्मिती करतच राहणार. त्यातून निसर्गात ढवळाढवळ होणारच. यत्किंचितही ढवळाढवळ होता कामा नये अशी कोणाचीच भूमिका असणार नाही. पण मनुष्यप्रेरित यांत्रिक निर्मिती – कुठेही, कधीही, कशीही केलेली ही सर्व नेहमीच स्वागतार्ह आहे असे म्हणणेही उचित नाही. यात तारतम्य, विवेक दाखवलाच पाहिजे. शृंगार हा मानवी जीवनाचा अविभाज्य आनंदवर्धक भाग आहे, म्हणून दुश्शासनाचा द्रौपदीवरचा अत्याचार हा काही आपण शृंगारिक अतएव स्वीकारणीय कधीच मानणार नाही. तशीच सर्वच कृत्रिम निर्मिती नेहमीच स्वागतार्ह आहे असे मानणे पूर्णत: असमर्थनीय आहे. तीही संयमाने केली पाहिजे. ती करताना निसर्ग राखलाच पाहिजे, लोकांना न्याय मिळालाच पाहिजे. निर्मिती आणि निर्मिती प्रक्रिया कर्म आणि फल यांच्यात गल्लत करणे अगदी चुकीचे आहे. अशी गल्लत करून लोकांना भ्रमात टाकले जाते. तुम्ही लोखंड, पोलाद वापरता ना? मग वाटेल तशी नासाडी करत, लोकांच्या पोटावर पाय आणत जमिनीतून लोखंडाचे खनिज काढलेच पाहिजे! ह्यासाठी गोव्यातील बेकायदेशीर खाणींचा पर्दाफाश सह्याद्रीची आर्त हाक! ८ -