पान:Sahyadrichi Aart Haak Dr. Madhav Gadgil 22nd May 2023.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

या सर्व घटनांना आणि घडामोडींना आता जवळपास एक दशक पूर्ण होत आहे. मात्र, दरम्यानच्या कालावधीमध्ये स्थानिक पर्यावरणाला नुकसान पोहोचवणाऱ्या खाणकाम, बांधकाम, उद्योग, पवन उर्जा प्रकल्प इत्यादींची मालिका पश्चिम घाट परिसरामध्ये सुरूच आहे. बेसुमार जंगलतोड, पोखरले जाणारे डोंगर, उत्खनन, झरे-ओढे व नद्या-नाले बुजवून त्यावर होणारे अतिक्रमण, औद्योगिक प्रदूषण, जलस्त्रोतांत सोडले जाणारे सांडपाणी अशा एक ना अनेक विघातक कृती विकासाच्या नावाने राबविल्या जात आहेत. ज्यामुळे पश्चिम घाट परिसराला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे. याची प्रचिती गेल्या काही वर्षांतील नैसर्गिक आपत्तींच्या रूपाने प्रकर्षाने येऊ लागली आहे. सन २०१८ मध्ये केरळला अभूतपूर्व असा महापूर आला. सन २०१९ मध्ये पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने कोल्हापूर व सांगलीला महापूराने अक्षरशः विळखा घातला होता. यंदा सन २०२१ मध्ये चिपळूण, महाड व कोल्हापूरला पूराच्या, दरडी कोसळण्याच्या, भूस्खलनाच्या व जमिनीला तडे जाण्याच्या प्रलयकारी घटना घडल्या. पर्यावरणवादी, अभ्यासक आणि तज्ज्ञांकडून या सर्व आपत्तींचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध पश्चिम घाट परिसरातील मानवी हस्तक्षेपाशी जोडला जात आहे. म्हणूनच या निरनिराळ्या आपत्तींच्या निमित्ताने पश्चिम घाट संवर्धनाचा विषय चर्चाविश्वात ऐरणीवर येत आहे आणि जोपर्यंत शासन स्तरावर ठोस धोरण हाती घेतले जात नाही तोपर्यंत भविष्यातही हा विषय चर्चेत येतच राहणार आहे. अशा पार्श्वभूमीवर मूळ इंग्रजी भाषेत असलेल्या या अहवालाशी निगडित तथ्य, तज्ज्ञ समितीचा दृष्टिकोन, भूमिका, निष्कर्ष, सूचना आणि शिफारशी इत्यादी बाबींची माहिती तळागाळातील स्थानिक व सर्वसामान्य नागरिक यांच्यासाठी साध्या-सोप्या मराठी भाषेत उपलब्ध व्हावी, तसेच या विषयाबाबत विविध स्तरावर असलेले समज- गैरसमज दूर होऊन जननागृती व्हावी या हेतूने डॉ. माधव गाडगीळ लिखित 'सह्याद्रीची आर्त हाक!: पश्चिम घाट समिती अहवालाचा मथितार्थ ही पुस्तिका 'वनराई' च्या वतीने प्रकाशित करत आहोत. या पुस्तिकेच्या रूपाने पश्चिम घाट संवर्धनाच्या चळवळीला बळकटी मिळेल असा आम्हाला विश्वास आहे.

आदरणीय डॉ. माधव गाडगीळ सरांनी 'वनराई'ला सदर पुस्तिका प्रकाशित करण्याची संधी दिली याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. तसेच ही पुस्तिका प्रत्यक्षात सह्याद्रीची आर्त हाक! ३