पान:Paripurti.pdf/98

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


परिपूर्ती / ११२
 

करून, शेवटी समाधी घेतली. मुलाने आपल्या मरणाची वाट पाहात बसायचे किंवा बिंबिसाराने आपल्या दीर्घायुषी वृद्ध पित्याला मारले त्याप्रमाणे मुलाकडून मारून घ्यायचे ह्यापेक्षा आपल्या हाताने आपण सर्वस्वत्याग करायचा हा सर्वोत्तम मार्ग रघूने आचरणात आणला. सर्व त-हेच्या भोगांचा संन्यास करावयाचा- राज्य, द्रव्य, स्त्री, सत्ता ज्याच्या ज्याच्यासाठी म्हणून मानव पूर्ववयात प्रयत्न करतो ते सर्व सोडून द्यावयाचे म्हणजे लौकिकष्ट्या मरणेच होय. जगणे ते फक्त 'कौतुकापुरते'च. असे झाले म्हणजे नव्या-जुन्या पिढीचा एकत्र सहवास सुखाचा व लाभाचा होतो; संस्कृतीच्या आत्म्याला नव-कलेवराची प्राप्ती होते. नाहीतर अक्षय आत्मा जीर्ण कलेवरात तडफडत राहतो. कलेवराच्या जीर्णत्वाने संस्कृतीच्या आत्म्याची प्रभा व प्रतिभा नष्ट होते; क्रियाशीलता, साहस व नवनिर्मिती जाऊन, अर्थशून्य बडबड व विकृत भोगलालसा मात्र शिल्लक राहून, सबंध समाजच रसातळाला जातो. मानव समाजात रघूची उदाहरणे फार थोडी, त्याउलट जास्त. आपल्याकडीलच सर्वांना माहीत असलेली ययातीची कथा अशाच एका सुखलोलुप जीर्ण कलेवराची आहे. ययातीचे मुलगे मोठे झाले, पण ययातीची राज्य व भोगलालसा कमी होईना. “तुमचे तारुण्य मला देता का?" असे त्याने विचारले. वरच्या मुलांनी स्पष्ट नकार दिला, धाकट्याने मात्र ते दिले अशी कथा आहे. ययातीला अजून काही वर्षे राज्य करायचे होते. मोठ्या मुलांना हा बेत पसंत नव्हता, म्हणून त्याने सर्वांना हाकून दिले. धाकटा पुरू अजून बाळ होता. तो वयात येईपर्यंत राजाला राज्य करण्यास अवसर मिळाला. तो वयात आल्यावर, भोग भोगून तृप्त झालेल्या व शिणलेल्या ययातीने त्याला राज्यावर बसवले अशी ही विलक्षण कथा आहे. रघुवंश हे एक काव्य आहे. काव्याच्याद्वारे कालिदासाने आपल्या सामाजिक मूल्यांचा आविष्कार केला आहे. एकएका राजाचे द्वारे एकएका मूल्याचे स्पष्ट चित्रण केले आहे. त्याचे राजे वास्तवातले नसून कवीच्या कल्पनासृष्टीतील होते. ह्याउलट, महाभारत एक इतिहास आहे. त्यात आलेल्या गोष्टी व प्रसंग वास्तव आहेत. मानवी मनाचा आविष्कार ध्येयवादी कवीने केलेला नसून जगात आहे तसा दाखविलेला आहे. ययातीचे चित्र मानव समाजात नेहमी आढळणारे आहे. त्याच ययातीचा वंशच शंतनु देवव्रताला राज्य देऊन संन्यास घेण्याऐवजी सत्यवतीच्या तारुण्याला भुलला व त्यामुळेच भारतीय युद्ध उदभवून कुलक्षय झाला हीही कथा सर्वांना माहीत आहे.आपली