पान:Paripurti.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०६ / परिपूर्ती
 

म्हणजे तोंड कसं सुरेख दिसेल!'"तिचा क्षणिक रुसवा नाहीसा झाला. स्नान करून, नव्या मुखवट्याने आपण रथात बसलो आहोत व लाखो मानव भोवती जयघोष करीत आहेत ह्या स्वप्नात ती पुजाऱ्याचा अपराध विसरली.
 जगन्नाथाची खिन्नता आणखी वाढली. “पोरी, यंदा रथयात्रा आपल्या नशिबी आहे का नाही कोण जाणे!" तो भरल्या गळ्याने म्हणाला. सुभद्रेचे लक्ष नाही हे पाहून तो आणखी काही बोलणार एवढ्यात सुभद्रेच्या पलीकडून दटावणीचा गंभीर आवाज आला, “कृष्णा, तुझ्या शंका-कुशका मनातच ठेवीनास? तिच्या सुखी जीवनाला काळजीची कीड लावून तुला काय मिळणार? जे होणार ते चुकत नाही. त्याचा विचार करून काय उपयोग?” “बरं आहे, दादा.” जगन्नाथ पडल्या आवाजात म्हणाला. गाभाऱ्यात घुमणारा आवाज थांबला. परत सर्वत्र शांतता पसरली. पुरीच्या जगन्नाथाच्या मंदिरातील मूर्ती आपले निश्चळ डोळे समोर लावून उभ्या होत्या. पाच-पंचवीस दर्शनेच्छू भाविक अंधारातच चाचपडत पंड्यांचे हात धरून गर्भगृहात येत होते. पायांखालची जमीन ओलसर, बुळबुळीत लागत होती. यात्रेकरू एकमेकांचे हात धरून जपून चालले होते. ही वेळ व हा महिनाही विशेष गर्दीचा नव्हता, पण जगन्नाथाच्या देवळात दोन-चारशे लोकांची आवकजावक नाही असे क्वचितच होई. अंधारातून गाभाऱ्यात गेले म्हणजे तेथे लावलेल्या समयांच्या उजेडात देवाचे पहिले दर्शन होते ते आश्चर्यकारकच वाटते. समोर तीन प्रचंड उभ्या आकृती व त्यांची चमत्कारिक रंगवलेली तोंडे दिसतात. डाव्या हाताला सात फूट उंचीचा पांढऱ्या शुभ्र तोंडाचा, मोठाल्या शंखाकृती डोळ्यांचा बलभद्र, उजव्या बाजूला सहा फूट उंचीचा काळ्याभोर तोंडाचा व मोठाल्या गोल डोळ्यांचा जगन्नाथ ऊर्फ कृष्ण व दोघांच्यामध्ये ठेंगणीशी, चार फुटांची, पिवळ्या तोंडाची सुभद्रा असे हे देवतात्रय आहे. ह्या श्रद्धावस्तूंना मूर्ती हा शब्द योग्य होणार नाही; प्रथमदर्शनी त्यांच्यात मानवी असे काही वाटत नाही. मूर्तीची नके तेवढी मोहि, पुढे आलेली व्यंगचित्रासारखीच दिसतात. हात म्हणजे कमरेपासून पुढे आलेले दोन दोन दांडकी आहेत व त्यावर लहान मुले काढतात तसे डोळे, नाक व तोंड काढली आहेत. कपाळ व भुवया जवळजवळ नाहीतच. डोळे भक्तांकडे रागाने रोखल्यासारखे वाटतात. तर तोंडाच्या लालचुटूक चन्द्रकोरीचे अक्षय हास्य मानवांना वेडावून दाखवते आहे अशी