पान:Paripurti.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१४
नव-कलेवर

 “सुभा, तुला नाही वाटत की, देवळात
काही निराळेच वातावरण आहे म्हणून?"
 जगन्नाथाचे वाट्यांएवढे गोल गरगरीत
डोळे विचाराने जरा संकोचले होते, आवाजात
कातरता जाणवत होती; पण सुभद्रेचे मुळी लक्षच
नव्हते, भाऊ काय बोलतो तिकडे; ती आपल्या
साडीची किनार नीट चापूनचोपून बसविली आहे
का नाही ते पाहत होती आणि चारपदरी हारातील
मधले चार लोंबते खडे बरोबर एकाखाली एक
आले असल्याची खात्री करून घेत होती.
सकाळची पूजा झाली की, दुपारचा भोग
येईपर्यंतचा मधला वेळ ती रोज असा घालवी;
पण आजच्या निरीक्षणाने तिला काही रोजचे
समाधान लाभले नाही. आपल्या चंद्राकृती
तोंडाचा चंबू करण्याचा प्रयत्न करीत ती
पुटपुटली, “हा पुजारी म्हातारा झाला आहे फार;
काय वेंधळ्यासारखी साडी नेसवली आहे! आणि
धसमुसळेपणानं माझ्या हनुवटीच्या बाजूचा
कागदसुद्धा थोडा फाटला आहे. बरं झालं
लवकरच सर्वांगस्नानाचा दिवस आहे म्हणून.
माझा मुखवटा ठिकठिकाणी सैल झाल्यासारखा

झाला आहे; त्या दिवशी नवा मुखवटा मिळाला