पान:Paripurti.pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०० / परिपूर्ती
 

 आपले व्यवहारही असेच चाललेले असतात व क्वचितप्रसंगी कालाचे दिङनिरपेक्षत्व आपणास अगदी तीव्रतेने जाणवते. गौरी उदाहरणे सोडवीत बसली होती. भागाकार-गुणाकाराचे प्रश्न होते. गौरीचे उदाहरण काही केल्या बरोबर येईना. म्हणून ती आपल्या बापाकडे आली. “बघ रे, काही केल्या उत्तर बरोबर येत नाही." येणार कसे उत्तर, गौरे? भागाकाराच्या तिथ गुणाकार केलास, आणि त्यातही आकडेमोडीच्या चुका!" आणि मग भागाकार कुठे व गुणाकार कुठे ह्याची समज तिला काही केल्या होईना. मी तिच्याकडे पाहात होते व बापलेकीचे संभाषण ऐकत होते. आधी मुळी गौरीचे लक्ष नव्हते. मग जेव्हा ती ऐकायला लागली तेव्हा ती बापाच्या तोंडाकडे बघून काहीतरी उत्तर द्यायची. होता होता तिचा जास्तजास्तव गोंधळ उडू लागला. “गौरे, तुला व चंदूला रोज एक एक लाडू दिला तर चार दिवसात तुम्ही किती लाडू खाल?" "गौरे, विचार कसला करतेस? रोज किती लाडू लागतात तुम्हाला?" गौरीने उत्तर दिले, “चार." "अग गऊ, असं काय करतेस? तू एक खातेस व चंदू एक खातो, मिळून किती?" पण गौरीचे तोंड लाल झाले होते. डोळे पाण्याने डबडबले होते- छे! ती गौरी नव्हतीच मुळी. मी थरथरत मास्तरांच्या पुढे उभी होते. माझीच भागकार- गुणाकाराची उदाहरणे चालली होती. मास्तर अर्धवट कीव येऊन अर्धवट रागाने माझ्याकडे बघत होते, माझे मन बधिर झाले होते. मास्तर काय बोलतात हे कानांना ऐकू येत होते, पण कळत नव्हते. पुढच्या क्षणात जागा झाला व बापलेकीची प्रश्नोत्तरे व्हायच्या आधीच मला समजली होती. इतक्यात त्याने विचारले, “गौरे, एक न एक किती?" गौरी बरोबर उत्तर देणे शक्यच नव्हते, पण तिने बापाच्या गळ्याला मिठी मारून रडायला सुरुवात केली व मी भानावर आले. क्षणापूर्वी मला मराठी दुसरीतल्या आठवणी विचारल्या असत्या तर अगदी प्रयत्न करूनही मला काही आठवले नसते, पण अर्धवट तद्रीत पसतीस वर्षांपूर्वीचा भूतकाल माझ्या आताच्या क्षणात जागा झाला व त्याच क्षणात पुढच्या चार-दोन पळांत काय होणार तेही मला कळले. आताचे भविष्यज्ञान म्हणजे केवळ भूतकाळाची पुनरावृत्ती नव्हती. मास्तरांनी मला पुढे काहीही न विचारता वर्गांच्या बाहेर उभे राहण्यास पाठवले होते, पण गौरीला काय प्रश्न येणार हे मला अगदी स्पष्ट कळले कारण वर्तमानकाळाशी माझी संवेदना संपूर्ण होती व हे पूर्णत्व भावी क्षणाच्या