पान:Paripurti.pdf/85

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


९८ / परिपूर्ती
 

जर बदलती असेल तर त्याची भूतभविष्याची परिमाणेही थोडीबहुत लवचिकच असणार. कधी चालू क्षणाचीच जाणीव इतकी तीव्र असेल की, इतर क्षण केवळ नाममात्र त्यात असणार, तरी कधी टेकडीवर उभे राहून अफाट अवकाशाचे क्षेत्र पाहता येते, त्याचप्रमाणे जाणीवेच्या एका क्षणात अनंत भूतकाळ व अनंत भविष्यकाळही दिसावयाला काहीच हरकत नाही.
 ज्याला आपण स्मरण वा आठवण म्हणतो ती वर्तमानकाळात जीवंत असलेली भूताची संवेदनाच नाही का? राम विश्वामित्राबरोबर जात असताना वामनाश्रमापाशी येऊन पोचल्यावर त्याच्या मनात खळबळ झाली असे कालिदास म्हणतो, आणि तेसुद्धा कसे तर पूर्वजन्मचेष्टाची आठवण न होतासुद्धा! प्रत्यक्ष घटना विसरल्या, पण त्या घटनांच्याबरोबर अनुभवलेल्या भावना मात्र राहिल्या. दुष्यंत एवढा विलासी, नाना स्त्रियांबरोबर प्रणय करून त्यांना विसरून जाणारा, पण त्याचेही सौंदर्यपिपासू मन एका क्षणाच्या सौंदर्यप्रचीतीने अनेकदा अनुभवलेल्या व अनेकदा विसरलेल्या, जुन्या काळच्या, जणू गतजन्माच्या झालेल्या सौंदर्योपभोगाच्या स्मृतीने विव्हळ झालेच ना? येथेही कालिदास 'अबोध' हेच विशेषण वापरतो, पण जन्मांतरीचे व्यापार कसे तर 'भावस्थिर सौहृद'रूपी प्रत्यक्ष प्रणयाची जिच्याशी प्रणय केला त्या व्यक्तीची स्पष्ट आठवण नाही, पण त्या वेळची भावना मात्र ह्या क्षणाला अंत:करण हलवते. वर्तमानकाळातील भूताच्या प्रचीतीचे कालिदासाचे वर्णन हे असे आहे. जैनवाङ्मयात जरी इतक्या काव्यमय पद्धतीने नाही तरी जन्मांतरीच्या स्थितीची जाणीव वर्तमानातील प्रसंगावरून झाल्याची उदाहरणे जागजागी विखुरलेली आढळतात. ही प्रचिती सौंदर्यप्रचीतीच्या द्वारे झाल्याचीच उदाहरणे दिसून येतात. पण मला वाटते इतरही संवेदना भूतकाळाचे वर्तमानकाळाशी साहचर्य घडवून आणावयास समर्थ आहेत. कलावंताच्या हृदयाला हा अनुभव सौंदर्याच्याद्वारे येतो इतकेच. उत्तर रामचरितात भूत, वर्तमान व भविष्य ह्यांची एकता, ह्यांचे एका अविभाज्य अनुभवात दर्शन, अती उत्कटतेने दाखविले आहे. राम, सीता व लक्ष्मण चित्ररूपाने रामाच्या पूर्वचरित्राचे अवलोकन करीत आहेत, त्या चित्रांच्या दर्शनाने गतानुभव इतके उसळून येतात की राम व सीता हे सर्व प्रसंग पूर्वी घडलेले आहेत हे विसरून शोकाने