पान:Paripurti.pdf/83

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


९६ / परिपूर्ती
 

तीन वर्षांचा होता- गौरी जिन्यावरून पडली तेव्हा नुकतीच आमची रात्रीची जेवणं आटपत होती.' ह्या बोलण्यावरून तुम्हा बायकांना काय अर्थबोध होत असेल देव जाणे! जाई १९३८ साली शाळेत जाऊ लागली- गौरी रात्री साडेआठच्या सुमारास जिन्यावरून पडली... म्हणजे कसं लख्ख सर्वांना कळतं." त्याच्या शास्त्रीय मनाला व्यक्तिगत कालगणना पसंत नाही हे उघडच आहे. पण खाजगी गोष्टींना सार्वजनिक कालगणना लावण्याचा अट्टाहास का हेच मला समजत नाही. सार्वजनिक कालगणना अगदी शास्त्रशुद्ध असती तर कदाचित हा अट्टाहास ठीक म्हटला असता, पण तीच जर तर्कशुद्ध नाही तर जेथे तिचा उपयोग खरा तेथे ती वापरावी, नाही तिथे इतर जास्त अन्वर्थक, सहेतुक कालगणना करण्यास प्रत्यवाय का? शिवाजीराजे १६३० मध्ये जन्मले व १६८० मध्ये वारले असे म्हटले तरी ठीक झाले. शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषांच्या जन्मेतिहासाचे कालमापन सार्वजनिकरित्या व मानवेतिहासाला महत्त्वाच्या ठरलेल्या दुसऱ्या घटनेशी संबंध जोडून अवश्य करावे. पण माझ्या जाईच्या शाळेत जाण्याची ख्रिस्ताच्या जन्माचा संबंध जोडणे निरुपयोगी व म्हणून अशास्त्रीय नाही का? मी कधी मॅट्रिक झाले ते मला सांगता येत नाही. एवढे बारीक आठवते की, माझ्या धाकट्या भावाची मुंज त्या वर्षी झाली. त्या मुंजीच्या निमित्ताने मला आईने घेतलेल्या शालूची आठवण येते. आमच्या पुण्याच्या घरच पहिलेच मोठे कार्य म्हणून सर्व नातेवाईक मंडळी आली होती ते आठवत; माझ्या भावाला पुढ्यात घेऊन मातृभोजनाला बसलेली आई डोळ्यापुढे दिसते; कधी नव्हत ते सोवळ्याचा पीतांबर नेसलेली, अंगावर शाल पांघरलेली माझ्या वडिलांची भव्य मूर्ती आज पुढ्यात उभी आहे असे वाटते. पण मी अमक्या साली मॅट्रिक झाले असे म्हटले तर त्यापासूनच मला अर्थ बोध होत नाही. की माझ्या व माझ्या स्वकीयांच्या आयुष्यातील एक सुखमय घटना म्हणून संवेदना होत नाही. 'ख्रिस्ताच्या जन्मानंतर एकोणीसशे अमुक वर्षानंतर तुझं लग्न झालं' हे म्हणणे जास्त बरे की, 'लग्न झाल तेव्हा तुला नुकतीच नोकरी लागली होती- लग्न झाल्यावर तुझ्या बायकोच्या परीक्षेचा निकाल लागला' अशी इतर घरगुती घटनांना सापेक्ष अशी कालगणना बरी अशी विचारणा केली तर, मला वाटते, अगदी पक्का शास्त्रीय माणूससुद्धा आमची बायकी कालगणनाच पत्करील.