पान:Paripurti.pdf/81

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


९४ / परिपूर्ती
 

तासांनी खायची आठवण ठेवतात-- रात्री निजली म्हणजे कशी अगदी नेमकी भल्या पहाटेस चार वाजता जागी होतात? आमचा नंदू म्हणे की, त्याच्या पोटात घड्याळ आहे. लहान मुलांचे सर्वच आयुष्य ह्या पोटातल्या घड्याळाबरहुकूम चालू असते- पण लहान मुलांना काळ गेला ही जाणीव असेलसे वाटत नाही. त्यांना जाणीव असते फक्त भुकेची. ती उठतात ती पोट रिकामी झाली म्हणजे... थकलेली इंद्रिये ताजीतवानी झाली म्हणजे ती टकटक बाह्यजगाकडे बघतात, उगीचंच हातापायांची हालचाल करतात, भूक लागल्यास पितात व थोड्याच वेळात परत झोपी जातात. आपण मोठी माणसे वेळ मोजतो आणि तो वेळ म्हणजे बाळाच्या भरल्या पोटातून अन्न आतड्यात प्रवास करते तो वेळ- ऊर्फ अन्नाचे पोटाच्या पिशवीतून आतड्यात होणारे स्थलांतर. म्हणजे परत चल वस्तूंचे एका विशिष्ट अवकाशातील भ्रमण! मुलांना काळाचे ज्ञान मोठी माणसे हळूहळू करून देतात पण त्यांना काळाची अनुभूती वा संवेदना कधी येते ते मात्र कळत नाही.
 थोडा वेळ माझे काळाचे ज्ञान बाजूला ठेवून माझी काळाची संवेदना वा अनुभूती काय आहे ह्याचा विचार केला तर ती गौरीपेक्षा निराळी नाही असेच दिसते. मलासुद्धा काही क्षण युगासारखे वाटतात व काही वर्ष क्षणासारखी वाटतात. आयुष्यातले कुठचेच दोन दिवस सारख्या लांबीरुदाचे वाटत नाहीत. कित्येक वेळा मुठीत घट्ट धरलेल्या वाळूच्या कणांप्रमाणे काळ झपाट्याने सरत असतो. तर कित्येकदा एखाद्या पर्वताप्रमाणे. स्थिर व अचल कालाची धोंड माझ्या हृदयावरून काही केल्या मला दूर करता येत नाही. ह्या अनुभूतीचा दिशेशी काही संबंध नसतो व ती सर्वस्वी आत्मगत असते. सर्वच संवेदना, मग ती कालाची असो, सुख-दुःखाची असो वा वस्तूची असो, अशी आत्मगत, स्वतंत्र असते. व्यवहाराच्या किंवा भाषेच्या द्वारे आपण तिला सार्वजनिक बनवतो. जेव्हा संवेदना भाषेच्याद्वारे सार्वजनिक बनते तेव्हाच निरनिराळ्या संवेदनाची तुलना करता येऊन ज्ञानलाभ होतो. कालाच्या संवेदनेला ज्ञानाच्या चौकटीत बसविण्यासाठी, सार्वजनिक बनविण्यासाठी, तिची दिशेशी सांगड घातली आहे व कालांतर म्हणजे स्थित्यंतर असे समीकरण आज सर्वांनी मानले आहे. आपण जसजसे म्हणजे होतो.... जसाजसा इतरांशी आपला व्यवहार वाढतो, तसतसे काळाच्या