पान:Paripurti.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
परिपूर्ती / ९३
 

तबकडीवर काटे हलत असतात, त्या काट्यांच्या हलण्याच्या गतीवरून आपण क्षण, तास व दिवस मोजतो. छायायंत्रामध्ये एका उभ्या दांड्याची छाया प्रवास करते, व तिचा जमिनीवरील प्रवास किती झाला हे बघून वेळ ठरविता येतो. घटिकापात्रात तर दिशेची- अवकाशाची- सर्वच परिमाणे कालमापनासाठी योजतात. वाटीची सर्व लांबी, रुंदी व उंची भरली म्हणजे कालाचा एक घटक झाला असे मानतात- ह्या सर्व युक्त्यांनी आपण मोजतो काय, तर पदार्थांची सापेक्ष गती व त्याला नाव देतो कालाचे! सर्व पदार्थ जर सारखेच गतिमान असते तर काळ कसा मोजता आला असता? मी आगगाडीच्या डब्यातून प्रवास करताना बाहेरचे सर्व पदार्थ विरुद्ध दिशेने धावताना दिसतात, पण मी स्वतः गतिमान आहे ह्याची जाणीव मला नसते. पृथ्वीबरोबर पृथ्वीवरील सर्वच सजीव-निर्जीव पदार्थ फिरत असतात, पण त्याची आपणाला जाणीव कोठे आहे? आपल्याला जाणीव आहे ती फक्त पृथ्वीच्याच गतीने न फिरणाऱ्या वस्तूंची, व आपण त्यांचा कालमापनासाठी उपयोग करतो. वस्तूंचे स्थित्यंतर म्हणजे काळ अशीच आपण काळाची व्याख्या करून टाकली आहे. सूक्ष्मात सूक्ष्म व मोठ्यात मोठा काळ गेला हे दाखवितानाही आपण ह्याच व्याख्येचा आधार घेतो. निमिषमात्र म्हणजे डाळ्यांच्या पापण्यांची अवकाशात जाणारी एक हालचाल. जैन वाङ्मयात काळाचे एक अचाट कोष्टक सापडते. एक महायोजन लांब, तितकीच रुंद व तितकीच खोल अशी विहीर खणावी. ती कोकराच्या अगदी अतिशय बाराक कापलेल्या केसांनी इतकी ठासून भरावी की, त्याच्यावरून पूर लाटला तरी फक्त वरचा थरच भिजावा. अशा ह्या विहिरीतून दर युगशतानतर एक-एक केस काढीत ती रिकामी होण्यास जो वेळ लागेल तो पल्योपमा काळ! जैनांच्या कल्पनाशक्तीचे कौतुक वाटते, पण त्यांनाही काळाची कल्पना आली असे म्हणवत नाही. सर्व परिमाणे मुळी दिशेचीच दिली जाहत. 'युग' हा शब्द तेवढा कालदर्शक आहे, पण युग हे संवत्सरावर, सवत्सर दिवसावर व दिवस सूर्याच्या आकाशातील स्थलातरावर आधारलेला आहे असे पाहिले म्हणजे आपण मोजतो ते स्थित्यंतर, काल नव्हे, हे कळते.
 पण लहान मुलांना- अगदी तान्ह्या मुलांना- घड्याळ वगैरे माहीत नसते तेव्हा काळ गेला हे कळतेच की नाही? ती कशी दर तीन साडेतीन