पान:Paripurti.pdf/79

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


९२ / परिपूर्ती
 

जायचं?" तिचे तासच काय, पण क्षण, दिवस वगैरे सगळीच कालपरिमाणे अगदी रबरासारखी लवचिक व सर्वस्वी तिची स्वत:ची अगदी खासगी अशी आहेत. आम्ही तिचे आचारविचार घड्याळाच्या वाटोळ्या तबकडीत बसविण्याचा प्रयत्न करीत आहोत व ती बिचारी लौकरच ह्या प्रयत्नाला बळी पडेल, पण अजून तरी तिचे कालमापन स्वतंत्रपणे चालू आहे.
 असेच स्वतंत्र कालमापन लहानपणी, मला वाटते, सगळ्यांचे चालू असते. मोठेपणी मात्र आपली काळाची जाणीव दिशेच्या जाणीवेशी इतकी जखडून टाकलेली असते की, आयुष्यातील काही असामान्य प्रसंगीच दिङनिरपेक्ष काळाची जाणीव आपणास होते. रात्री निजले म्हणजे सकाळी उठेपर्यंत काही काळ गेला हे कळावयास मुलांना किती उशीर लागतो! कधी कधी मुले बोलतात त्यावरून आपल्याला त्यांच्या मनात डोकावता येत, पण ती बरेचदा आपले अनुभव सांगत नाहीत- तशी त्यांना गरज वाटत नाही. एखादे वेळी आपल्या लक्षात येते की, त्यांचे आणि आपले विश्व अगदी निराळे आहे म्हणून! नंदू काकाकडे राहावयास जाऊन आला होता व मी त्याला विचारीत होते की, काकाकडे काय काय गंमत केलीत म्हणून खेळणे, हुंदडणे, खाणे, भांडणे, वगैरेचे वर्णन झाल्यावर नंदू आठवण झाल्यागत थांबला व म्हणाला, “काकाकडे सगळं चांगलं होतं, पण रात्री झोप मात्र मुळीच येत नसे.” “म्हणजे काय बाबा? काय डास ढेकूण फार होते?" मी आश्चर्याने विचारले. "छे! ग! डास ढेकूण काही नव्हत... पण झोप यायची नाही एवढं खरं. जरा कुठे अंथरुणावर पडतो न पडतो तो चहाच्या कपबशाच्या खडखडाटानं जाग यायची." रात्री नवापासून सकाळी आठापर्यंतचा गाढ झोपेत घालविलेला अकरा तासांचा वेळ नंदोबाच्या मते काही क्षणांचा होता!
 आणि खरोखरच तो काही क्षणांचाच होता. त्या क्षणांना अकरा तास म्हणणे ही एक फसवणूक आहे. काल ही एक संवेदना आहे, व तिचे मोजमाप करायचेच तर कालपरिमाणानेच व्हावयास पाहिजे; पण आपण कालाची दिशेशी सांगड घातली आहे व दिशेची लांबी, रुंदी, खोली व उंची ही परिमाणे मोजून काळ मोजल्याचा आभास निर्माण करीत असतो. घडयाळ घटियंत्र, छायायंत्र, सर्वच साधने एका अचल पार्श्वभूमीवर दुसऱ्या हलणाऱ्या वस्तूंचा संचार किती झाला एवढेच दर्शवितात. घड्याळाच्या गोल