पान:Paripurti.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
परिपूर्ती / ८५
 

काढणार? वगैरे प्रश्नांचा पाऊस पडत होता व शक्य तितक्या प्रश्नांची उत्तरे शक्य तितक्या सोप्या भाषेत द्यावयाचा माझा प्रयत्न चालला होता. इतक्यात एकजण म्हणाला, “बाई, ह्याबद्दल लिहिलेले एखादे पुस्तक दाखवा की आम्हाला." मला हेच हवे होते. मी जराशा ऐटीनेच स्वत: लिहिलेले एक इंग्रजी लिखाण त्याच्यापुढे टाकले व म्हणाले, “पाहा, यात सगळे काही आहे.” इतर जातींच्या बाबतीत माझी ही युक्ती हटकून यशस्वी झाली होती. माझे इंग्रजी पुस्तक पाहून व साधारण इंग्रजी जाणणाऱ्यांनासुद्धा न कळणारे ते जाडे-जाडे शब्द पाहन चौकस माणसे गप्पच बसायची; पण ह्या गृहस्थाने मला दाद दिली नाही. त्याने एकदा पुस्तकाची पाने चाळली, पुस्तक टेबलावर फेकले, आणि मान हलवून मला म्हणाला, “हे पुस्तक तर इंग्रजीत आहे. आमच्यासारख्यांना ह्यात काय लिहिलं आहे ते काय कळणार? आम्हाला कळायला तुमचं पुस्तकं मराठीत हवं होतं, नाही का?"
 ह्यानंतर काही दिवसांनी मी भंडाऱ्याहून साकोरीला चालले होते. गाडी भंडाऱ्याहून सकाळी निघाली. जवळजवळ गाडीची भरती झाली होती. अर्धा मैल जाऊन गाडी थांबली व गृहस्थ गाडीत शिरले, “आज सकाळीच काम सोडून बाहेरगावी कुठं निघाला?' गृहस्थ म्हणाले, “ह्या महारांची प्राथमिक निवडणूक आहे ना! त्याच्या प्रचारासाठी मला तीन दिवसांची सुटी मिळाली आहे." म्हणजे तुमचा ह्या निवडणुकीशी काय संबंध?' गृहस्थ सांगू लागले, “तो शिदू महार आहे ना आमच्या कारखान्यातला, तो काँग्रेसच्या तिकिटावर उभा राहिला आहे. आमचे शेट त्याला मदत करताहेत.” “मग शेटची दुसरी माणसे का नाही जात?" "हेच तर तुम्हाला कळत नाही. तो शेटचा माणूस म्हणून काही जाहिरात नाही लावायची, समजतात? इकडे लोकांना कुणकुण आहे, पण तिकडे गोंदियाचे बाजूस अजून लोकांना माहीत नाही तोवर त्याच्याबद्दल काँग्रेसच्या बाजूने प्रचार करण्यास जात आहे." थोडा वेळ कोणी काही बोलले नाही. परत एकाने प्रश्न केला, “कोठचा उमेदवार निवडून येईल ह्याचा काही अंदाज आहे का?" कार्यकर्त्याने तोंड जरा आंबटच करून उत्तर दिले, “आंबेडकरांचा माणूस पहिला हे ठरलेलेच आहे. बहुधा दुसराही त्यांचाच येईल. किती पैसा ओतला तरी पहिली जागा आम्हाला मिळणे शक्य नाही." मनातल्या मनात मी महारांना धन्यवाद दिले. माझे मन केवढे मोठे झाले होते! कार्यकर्त्यांचे तोंड जरा खुलले. तो पुढे म्हणाला, “पण तिसरी व चौथी जागा आमचीच