पान:Paripurti.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८२ / परिपूर्ती
 

त्यांच्या पायाला चाक बांधलेले असते व त्यांच्याइतकी पायपीट खेड्यात दुसरे कोणी क्वचित करीत असेल, पण ही सर्व भ्रमंती गावकामगार म्हणून असते. भटक्या जाती आज येथे तर उद्या तेथे अशा असतात, फक्त पावसाळ्यात त्यांचा मुक्काम एके जागी असतो. पण महार आपापल्या गावचे पिढीजात रहिवासी असतात. इतके असूनही महारांना नांगरटी फारशी माहितीच नाही. गावात सगळ्या महारांचा मिळून सगळ्यांत वाईट जमिनीचा एखादा तुकडा असायचा. त्या तुकड्यात पिकणार काय आणि त्यातील प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला तरी काय येणार? कोणाचेच लक्ष तो तुकडा कसण्याकडे नसते. इतर गावकऱ्यांचे तसे नसते. त्यांचा प्रत्येकाचा स्वत:च्या जमिनीशी एकजीव झालेला असतो. शेताला अंकुर फुटला की, त्यांच्या आशेला अंकुर फुटतो. शेत करपले की, त्यांचे जीवन करपत. शेताला पाऊस चांगला मिळाला की, त्यांची तोंडे टवटवीत होतात. पीक तान्हेले राहिले तर त्यांच्या तोंडाला कोरड पडते. शेतातल्या झाडापेक्षाही खोलवर त्यांचे आयुष्य पिढ्यानपिढ्या जमिनीत रुजलेले असते. जमिनीच्या सहवासाने त्यांना जमिनीचे वाण आणि गुण दोन्हीही लागतात. जमिनीचा रंग, आणि जमिनीचा जडपणा दोन्हीही त्यांच्या अंगी येतात. त्यांचे चालणे धीरगंभीर, त्यांचे बोलणे अतिसावकाश आणि त्यांच्या मनाचे सर्व व्यवहार पण हळू चालतात; ह्याच्याबरोबर उलट महारांची स्थिती असते. त्यांना जड जमिनीतून पोटाला मिळवायचे नसते, तर माणसांकडून मोठ्या मिनतवारीने कोर-अर्धा कोर भाकर काढावयाची असते. घरात साठवण करण्याइतके कधी त्यांना मिळत नाही; इतके त्यांचे पोट हातावर असते. पडेल जनावर ओढायचे, गावचे निरोप घेऊन जायचे, पाटलाच्या मागे असायचे, गावात गस्त घालायची, सगळ्यांच्या जमिनीच्या भांडणात महाराची साक्ष असायची. यामुळेच चौकसपणा, हजरजबाबीपणा ही महारात दिसून येतात. बुद्धी चंचल आणि लवचिक असते. नव्या मनूत नवे चटकन् उचलण्याची त्यांची तयारी असते. पोटाच्या रोजच्याच काळजीमुळे म्हणा किंवा एकाच उद्योगाने पोट भरणे शक्य नसल्यामुळे म्हणा, ते हजार उद्योग करतात. त्यांना गावच्या सगळ्या घरातील खडानखडा माहिती असते. आणि तीसुद्धा फक्त चालू पिढीची नसून कित्येक पिढ्यांची! गावातली सगळी बिंगे, सगळ्या भानगडी, सर्व घरगुती कटकटी यांची महार म्हणजे एक चालतीबोलती नोंदवही असते. महारांना गाणे, नाचणे व नक्कल छान करता येते, आणि