पान:Paripurti.pdf/55

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


परिपूर्ती / ६३
 

त्यापेक्षा पार्वतीवर मनापासून प्रेम करणारा, राकट, जंगली शंकर पत्करला. लहानपणी मन कसे स्वच्छ असते! त्याची प्रवृत्तीसुद्धा कशी सरळ असते! तेव्हा मनात फक्त राग येई. मोठेपणी मन संस्कारित झालेले, फाटे फुटलेले, गढूळ झालेले- आता परित्यक्ता स्त्रियांनी आश्रमात “सीताकांतस्मरण' अशी घोषणा केली की मनात राग येऊन राहात नाही तर "खरेच, रामासारख्या माणसांमुळेच तर असले आश्रम भरतात, तेच असल्या संस्थांचे आश्रयदाते, तेव्हा त्यांचे स्मरण योग्यच आहे! असा कडू, कुटिल विचारही मनात डोकावतो. कालिदास व भवभूती वाचून रामाबद्दल वाटणारा संताप कमी झाला, पण त्याची जागा तिरस्काराने घेतली. चांगले-वाईट काय, न्याय्य-अन्याय्य काय, हे माहीत असूनही चांगल्याची व न्यायाची कास ज्याला धरता येत नाही त्याची कीव करावी का तिरस्कार करावा? सीतेलासुद्धा तसेच वाटले असले पाहिजे. नाहीतर शेवटी ती मानिनी पृथ्वीच्या पोटात जाण्याचे का पत्करती? रामाची सत्यप्रियता, चांगुलपणा, सीतेवरील प्रेम ह्यांचा सीतात्यागाशी मेळ कसा घालावयाचा? काही वर्षांपूर्वी 'महाराष्ट्र-साहित्य पत्रिके'त 'अंकुशरामायण' म्हणून बायकांचे एक गाणे त्रुटित स्वरूपात प्रसिद्ध झाले होते. माझ्या ऐकण्यात निरनिराळ्या स्त्रियांकडून त्या गाण्यातील मधल्यामधल्या ओव्या आलेल्या होत्या. ते गाणे रचणाऱ्या बाईला वा बुवाला पण सीतारामाच्या गोष्टीचे कोडे पडलेले दिसते. पण ते मात्र अगदी निराळे कोडे, मला पडलेले नव्हे. सीता शुद्ध तर तिला दोन मुले एका वेळी झालीच कशी? ह्या कोड्यातून त्याने एक विलक्षण युक्ती योजून आपली सुटका पण करून घेतली. त्या गाण्यात खालील कथा सांगितली आहे. रामाने टाकल्यावर सीतेचा प्रतिपाळ वाल्मिकीने केला. वाल्मिकीला बायांच्या गाण्यात सर्वत्र 'तातोबा' असे नाव आढळते. ह्या तातोबाच्या आश्रमातच ती बाळंत झाली व तिला एक सुंदर मुलगा झाला, त्याचे नाव लह. एकदा सीता मुलाला पाळण्यात ठेवून नदीवर धुणे धुवावयास गेली, तेथे तिला एक माकडीण भेटली. तिने विचारले, “सीते, नदीवर काय करतेस?" सीता म्हणाली, “माझी न बाळाची धुणी धुते." माकडीण आश्चर्याचे उद्गारली, “काय? तुला अगदीच कशी माया नाही? तेथे पाळण्यात एकट्याला कोणी काही इजा केली म्हणजे? मी बघ, माझ्या पोराला कधी विसंबते का? बघ, माझ्या पाठीवर नाहीतर पोटावर त्याला बाळगते. धन्य आहे तुम्हा माणसांची!" हे ऐकून सीता घरी गेली व बाळाला