पान:Paripurti.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६२ / परिपूर्ती
 

आमचे बायकांचे मेले दैवच असे! मी वेडी, माझ्या काही लक्षात आले नाही की, द्वंद्वाचे पाचारण केले म्हणजे दोघांची प्राप्ती होते ते. राजा, आता मुलांच्यासाठी मला भरीस घालू नको. आता एवढे माझे मागणे ऐक." अर्थातच मुले होण्याच्या खटाटोपातून कुंतीने अंग काढून घेतले व माद्रीलाही काही करता येणे शक्य नव्हते म्हणून पांडव पाचच राहिले. मी हसले व म्हटले, “वा रे सवती-सवतीचे भांडण!"
 पण माझ्या वाचणाऱ्या मनाच्या मागे उभे राहून, माझ्या खांद्यावरून पुढे डोकावून, माझे दुसरे एक मन तोच मजकूर वाचीत होते. त्याचे काही समाधान झाले नाही. वाचलेल्या प्रसंगाला 'सवतीमत्सर' अशी चिठ्ठी चिकटवून अनुभूतीच्या कपाटात तो टाकून पुढे जावे असे त्याला वाटेना आणि ह्या त्या आगंतुक, मला माहीत नसलेल्या, मनाच्या हेकटपणामुळे पुढे वाचण्याकडे लक्ष लागेना, व मला पुस्तक मिटावे लागले. ते मन जुन्या अनुभूतींच्या भूमीत पुरलेली काहीतरी गतस्मृती हुडकून काढण्यात गढले होते. सापडले वाटते ते गतस्मृतीचे हाडूक, व त्याचबरोबर दोन्ही मनांची जुळणी पण झाली; कारण त्याच क्षणी मी उल्हासले, पुस्तक परत उघडले. ज्या मजकुरावर माझे दुसरे मन घोटाळत होते तो परत वाचला, “न ज्ञासिषम अहं मूढा द्वंद्वाह्लाने फलद्वयम।" ही ती ओळ होती. माद्रीने पुत्रार्थ जुळे देव बोलावले व ह्या युक्तीने एका आवाहनात दोन मुलांचा लाभ घेतला. मग काय मरुदगणांचे चिंतन केले असते तर तिला एकदम अकरा मुले झाली असती? मला आठवले की, युरोपातील काही जुनी गाणी वाचीत असता त्यात एक अशी कथा होती की, एका व्यभिचारिणीला जुळे मूल झाले तेव्हा तिचा व्यभिचार सिद्ध झाला असे समजून तिला व मुलांना लोकांनी ठार मारल. त्याच्याबरोबर कित्येक वर्षे न सुटलेल्या एका कोड्याचा निकाल लागतोसे वाटले.
 रामाने सीतेला टाकले- लोकापवादावरून टाकले - ही एक अशा घटना आहे की, त्यापुढे मान तुकवायला माझे मन कधीही तयार होत नाही. लहानपणी मला राम ह्या व्यक्तीबद्दल द्वेष व संताप येई. स्वतःच्या मोठेपणासाठी त्याने आपल्या बायकोचा बळी दिला असे माझे अगदी ठाम मत असे. आमच्या शाळेत किंवा हिंगण्याच्या अनाथ बालिकाश्रमात जेवणाच्या वेळी मुली “सीताकांतस्मरण जयजयराम' म्हणतात. मला वाटते, निदान स्त्रियांच्या संस्थेत तरी रामाचा बडेजाव होता कामा नये.