पान:Paripurti.pdf/41

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


परिपूर्ती / ४५
 

रडायची, धड खायची नाही, प्यायची नाही. चोरासारखी वावरायची. कधी प्रश्न विचारला तर दोन शब्द बाहेर पडायचे नाहीत तिच्या तोंडातून. काल इतक्या वर्षांनी अचानक गाडीत एकदम भेट झाली. मला ओळखलीच नाही तीच ही मारी म्हणून. मारी पण हसली व मान वेळावून म्हणाली, “सिस्टर, त्या वेळी माझी स्थिती निराळी होती. मी अनोळखी माणसांत आले होते. मला नर्सच्या कामाची इतकी शिसारी यायची की काम केलेल्या हातानं काही खाऊ-पिऊ नये असं वाटायचं." मला पटले तिचे. शरीरशास्त्र शिकवताना प्रेताची हळूहळू चाकूने चिरफाड करावी लागे त्यावेळी पहिल्या- पहिल्याने मला अगदी असेच होई. मी विचारले, “तुम्हाला जर ह्या कामाची इतकी शिसारी तर त्यात शिरला कशाला?"
{{gap"""मला गत्यंतरच नव्हतं." ती म्हणाली. “माझे बाबा होते तोवर एखाद्या राणीसारखी माझी परिस्थिती होती. घरात इकडची काडी तिकडे करू द्यायचे नाहीत. पण ते अगदी ऐन उमेदीत वारले. त्यांचा धंद्यात गुतवलेला पैसा बुडला, कारण आम्हाला त्यात काहीच समजत नव्हते. पाच भाऊ माझ्या पाठचे- मग काय करायचे? गावच्या पायांच्या वशिल्यानं आईनं माझी नर्स म्हणून शिकण्याची व्यवस्था केली. आता भाऊ मिळवते आहेत- कुटुंब सावरलं आहे. आई म्हणते नोकरी सोड म्हणून. मण मलाच बरं वाटत नाही भावांच्याकडे तुकडे मोडणं." ही सर्व हकीकत तिने सहज नेहमीच्या स्वरात सांगितली. त्यात दु:ख नव्हते, स्वत:बद्दल कीव नव्हती. की अभिमान नव्हता. ती काही स्थितप्रज्ञ नव्हती. तिला सुख-दु:खे सारखी नव्हती. तिचे मन काही योग्यासारखे मानवी व्यवहारापासून अलिप्त नव्हते. उलट ती जीवनात पूर्णपणे बुडालेली होती. अगदी लहान सहान गोष्टीतून ती स्वत:ला आनंद निर्माण करीत होती आणि स्वत:ला नकळत जिथे जाईल तिथे आनंद पसरीत होती. आताच पाहा ना, ती मला पुढे सांगू लागली, "आणखी आता मला नोकरी चांगली आहे. माझं बिहाड सुरेख आहे. आठवड्यातून दोनदा सिंहाचलमवर गेलं की समोरचं बंदर व पुढे पसरलेला अफाट समुद्र कितीदा जरी पाहिला तरी परत-परत पाहावासा वाटतो. आता मला पारूरसारख्या लहान गावात करमणार पण नाही.” “म्हणजे तुम्ही विजगापट्टमला असता वाटतं?" मी विचारले. “नाही, वाल्टेरला- तिथून कधीकधी बंदरावर जाते. पण आमचं इस्पितळ वाल्टेरला आहे. तुम्ही पाहिलं आहेत का? फार छान शहर आहे, नाही?"