पान:Paripurti.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
परिपूर्ती / ४३
 

दिसत होती. ही विचित्र बाई अशी काय बसली आहे असा माझ्या मनात विचार येतो तोच ती उदगारली, “माझी छबडी ती! जाईच्या फुलांची रास घातली आहे जणू! सिस्टर, बघा ना जरा-” सारम्मा तर उठलीच पण मीही हा प्रकार काय आहे, म्हणून पुढे होऊन उघड्या दारातून शेतखान्यात डोकावले. तोंड धुवायच्या भांड्याखाली मोकळी जागा असते तेथे पाच लहान पांढरीशुभ्र कबुतरे बाजरी खात होती- डौलाने चालत होती- घशातून लाडिक आवाज काढीत होती. मी मारीकुट्टीकडे पाहिले- तिच्या डोळ्यांतून वात्सल्य ओसंडून जात होते. ती सांगत होती, “बिचारी कालपासून त्या टोपलीत कोंडून पडली होती! आता पहा जरा हलायला मिळाले तर कशी खुशालली आहेत ती! माझी जाईची फुलं ती!" तिने एकेकाला उचलून कुरवाळले, क्षणभर आपले गाल त्यांच्या शुभ्र अंगावर टेकले व त्यांना उचलून परत टोपल्यात ठेवले. मी मात्र स्तिमित नजरेने मारीकुट्टीकडे पाहात होते. तिच्या कुरूप चेहऱ्यामागे लपलेले जाईच्या फुलासारखे कोमल, काव्यमय हृदय कसे ढगाआडच्या सूर्यप्रकाशासारखे आल्हाददायक वाटत होते! ती परत माझ्या शेजारी येऊन बसली. मी खिडकीतून बाहेर पाहू लागले. “अंधारात बाहेर काय पाहता आहा?" मी म्हटले, "छे! बाहेर अंधार नाही- पूर्णिमा चार दिवसांवर आली नाही का? पाहा कसं चांदणं पडलं आहे ते!" ती माझ्या खिडकीशी येऊन दोन क्षण मुकाट्याने बाहेर डोकावून पाहात होती. एक निश्वास टाकून ती म्हणाली, “ह्या वेळी आम्ही पुनवेचा चंद्र परस्परांच्या सहवासात पाहू." मला तिच्या बोलण्याचा अर्थ कळला नाही. वाक्य तर ती संबंध डबाभर ऐकू जाईल एवढ्या मोठ्याने म्हणाली होती. मी हळूच विचारले, “तुम्ही काय म्हणता मी उमजले नाही." ती सांगू लागली, “त्याचं असं आहे, मी घरापासून शेकडो मैल दूर राहाते. मागच्या वेळी मी नोकरीच्या गावी गेले, आई लागली रडायला. तशी मी तिला म्हटले, 'हे बघ आई, मी तुला दर दोन दिशी पत्र पाठवीन आणि दर पुनवेला बरोबर आठ वाजता चंद्राकडे पाहा, मी पण पाहीन- एकाच चंद्राकडे दोघींनी एकाच वेळी पाहिलं म्हणजे एकमेकींशी बोलल्यासारखंच आहे.' गेल्या वर्षभर तसंच केलं. आता पुढचा चंद्र मात्र घरच्या अंगणात आईजवळ बसून बघेन मी." त्या विलक्षण बाईने अगदी सहजगत्या सांगितले- मला आश्चर्याचा आणखी एक धक्का बसला. तिचे बोलणे, हसणे सगळे कसे अगदी लहान मुलासारखे भाबडेपणाचे होते! तिच्या भावनात काव्य होते व तिचे