पान:Paripurti.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
 परिपूर्ती / ३९
 

सासू आपल्या थोरल्या सुनेला बोलावून मायावीपणे म्हणते, “कौसल्ये- (काशीकोसलची राजकन्या)- बाई, माझं बोलणं ऐक. आपला कुलक्षयच होणार होता. पण भीष्मानं मला युक्ती सांगितली आहे. नाही म्हणून नकोस. तुझं कल्याण होईल. त्या युक्तीप्रमाणे वागून पुत्राला जन्म दे व वंशवर्धन आणि राज्यवर्धन कर." ह्या मोघम बोलण्यात सत्यवतीने भीष्माचे नाव मोठ्या खुबीने गोवले आहे. “भीष्माची युक्ती" ह्या शब्दाने सुनेला वाटावे की, सासू पुत्रोत्पत्तीसाठी माझ्या शूर दिराची निवड करते म्हणून, व तशी आशा बिचाऱ्या अंबिकेच्या मनात उत्पन्न झाली असे कवीने पुढे स्पष्टच केले आहे. पुढच्या अध्यायाच्या पहिल्या चार कविता म्हणजे मला काव्याची परिसीमाच वाटते. त्या वाचताना जुनी व ने बुजलेली जखम परत वाहावी तसे मला होते. प्रत्येक चरणात किती चित्रे डोळ्यांपुढून जातात! आठच ओळींत एका पतित, भ्रष्ट वृद्धेचे कारस्थान, एका अभागी राजकन्येची सुंदर सुंदर स्वप्ने, तिची विटंबना व मानहानी इतक्या घटनांची हकीकत स्पष्ट मोजक्या शब्दांत, गूढपणाचे अवडंबर न माजवता दिलेली आहे.
 ततः सत्यवती काले वधू स्नातां ऋतौ तदा।
 संवेशयन्ती शयने शनकै: वाक्यमब्रवीत।।"
 "नंतर योग्य वेळी ऋतुस्नात अशा वधूला शय्यागारात पोहोचवताना सत्यवती खालील शब्द बोलली."
 कौसल्ये देवरः ते अस्ति सो अद्य त्वानुप्रवेक्ष्यति।
 अप्रमत्ता प्रतीक्ष्यैनं निशीय आगमिष्यति।।'
 "कौसल्ये, तुझा एक दीर आहे. आज तो तुझ्या ठायी येईल. विनयाने त्याची वाट पाहा, तो आज रात्री येईल."
 (नुसता ‘दीर' असा मोघम शब्द आहे. अंबिकेला आपल्या सासूचे पूर्वचरित्र माहीत नव्हते. 'भीष्माने युक्ती सांगितली आहे' असे सर्वस्वी खोटे ती आधी बोललीच होती. शिवाय आपण जो दुष्ट बेत योजला होता तो जणू काय भीष्माचीच युक्ती असेही तिला जगाला भासवायचे होतेच.)
 'श्वश्व्रास्तद्वचनं श्रुत्वा शयाना शयने शुभे।
 सा चिन्तयत्तदा भीष्ममन्यांश्च कुरुपुङगवान।।"
 "सासूचे हे भाषण ऐकून सुंदर शय्येवर निजलेली ती मनात भीष्माचे व इतर कुरुवीरांचे चिंतन करू लागली."
 (पहिल्याने सर्व राजांसमक्ष आपल्याला हिरावून नेणा-या भीष्माची