पान:Paripurti.pdf/33

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


परिपूर्ती / ३७
 

संकेतांना बळकटी आणण्यासाठी होतो. विवाह हाही एक अतिप्रभावी सामाजिक संकेत आहे. त्यात मालकीहक्क आहे, वारसा आहे, संपत्तीच्या सर्व कल्पना केंद्रीभूत झालेल्या आहेत. जिच्याशी लग्न झाले, तिच्यावर नवऱ्याची सर्वस्वी मालकी असते व तिची संतती नव-याची होते. एकदा हा संकेत मान्य केला म्हणजे मूल कोणाच्या बीजाचे हा प्रश्न विवाहबंधनात झालेल्या संततीबद्दल उत्पन्न करून घोटाळा मात्र निर्माण होतो व पूर्वी ह्या प्रश्नाला फारसे महत्त्वही नव्हते. बायको लग्नाची नसली तरच कोणाचे बीज हा प्रश्न उदभवे. विवाहातील व विवाहबाह्य, औरस व अनौरस हे भेद हळूहळू निर्माण झाले.
 दुष्यंताच्या कथानकात- म्हणजे कालिदासाचे शाकुंतल नव्हे, तर महाभारतातील आख्यान- घटना मोठी मजेदार आहे. दुष्यंत कोण हे समजून शकुंतला त्याच्या गळ्यात पडली. टाकून दिलेल्या, आश्रमात वाढलेल्या या अनाथ महत्त्वाकांक्षी मुलीने मोठा डाव रचला, मोठे धाडस केले, पण बिचारीला तोंडघशी पडायची पाळी आली होती. ती मुलगा घेऊन राजाच्या राजधानीत गेली, पण राजाने तिला ओळखूनही जणू काही आपण त्या गावचेच नाही असे दाखवले. राजाने तिच्या आईचे चारित्र्य बाहेर काढले, तर शकुंतलेने त्याला दुरुत्तरे केली. ‘गाठ पडली ठकाठका' असा हा प्रकारे झाला. ती जीव तोडून त्याला दिलेल्या आणाभाकांची आठवण देत होती. ती म्हणे, “राजा, तू कितीही खोटं बोल. तुला कितीही वाटो की, त्यावेळी तर मी एकटा होतो, माझ्या कृत्याला साक्षी कोणी नव्हतं, पण सूर्य-चंद्र, जल आणि अग्नी, आकाश आणि पृथ्वी, तुझं स्वत:चं हृदय आणि यमधर्म, दिवस-रात्र, सकाळ आणि सांज ही सर्व मनुष्याच्या प्रत्येक कृत्याचे निरीक्षण करतात बरं!" पण ही सर्व विनवणी व्यर्थ होती. राजाने त्या वेळीच तिला राजधानीत आणले असते तर लग्न न होताही ती त्याच्या अंत:पुरात राहती. पण आता इतक्या वर्षांनी केवळ मुलाच्या आशेने राजाने एका स्वैरिणीचा स्वीकार केला हा ठपका त्याला नको होता. ती त्याच्या घरी राहून मग तिच्या पोटी कोणाचेही पोर असते तरी त्यावर त्याची सत्ता होती. पण केवळ एका वेळी काही वर्षांपूर्वी मी हिच्याशी संगत केली होती असे म्हणून मुलावरील त्याचे पितृत्व सिद्ध होत नव्हते. म्हणून आकाशवाणी व्हावी लागली व मुलगा तुझ्या बीजाचा' अशी खात्री पटवून शकुंतलेला त्याला स्वीकारता आली. त्याच्या बीजाची संरक्षक म्हणून तिचे चोज, एरवी नाही.