पान:Paripurti.pdf/30

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


परिपूर्ती / ३३
 

म्हणाली, "त्यांच्यात तडफ म्हणून नाहीच; ते फारच गरीब आहेत हो! मी त्यांच्याबरोबर बिऱ्हाड थाटून होते की-कधी एक अवाक्षर नाही की रागावणं नाही!" माझ्या डोक्यात लख्खन प्रकाश पडला. मला माझा वाईचा अनुभव आठवला, मला कोर्टातील केस आठवली, माझ्या ओळखीचे आणखी एक कुटुंब आठवले. गृहस्थ सुसंस्कृत, विद्वान व रसिक होता- त्याचे ते उदास, करुण डोळे, त्याच्या बायकोचा खुला उमदा चेहरा, त्याच्यावर दिसत असलेला आत्मविश्वास, किंचित पुरुषी उद्धटपणा हे आठवले. ते जगात दपती होते, पण त्यांचे खरे नाते नवरा-बायकोचे नव्हते, मित्र-मैत्रिणीचे नव्हते, तर माता-पुत्राचे होते. कोर्टातील केस सोपी होती, तिचा निकाल समाधानकारकपणे लावता आला... तेथील मंडळी एकमेकांना ओळखून होती; पण मध्यम वर्गाचे सर्वच अर्धवट. माझ्या शेजारी बसलेली तरुण बाई मला विचारीत होती, "काय हो, आता घटस्फोटाचा कायदा झाला म्हणजे मला नीट काडीमोड मिळेल, नाही का!" पण माझे मन दुसरेच एक कोडे सोडविण्यात गुंतले होते-- वरवर संस्कृतीची आवरणे असलेल्या, पण आतून रानटी पौरुषाची पूजा करणाऱ्या ह्या 'तडफदार' तरुणी आणि सुसंस्कृत, शिक्षणाने कोमल मनोवृत्ती झालेले अहिंसक तरुण ह्यांची जोडी एकत्र नांदणार कशी!