पान:Paripurti.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३० / परिपूर्ती
 

'हो ना' करता करता तसे करायचे ठरले व पुढचे चार दिवस काकांनी प्रत्येक शेतकऱ्याला विचारले, "काय हो, कधी बायकोला मारता का?" आणि त्यांना उत्तर मिळायचे, "हो रोजच नाही काय- कधीमधी लागतंच माराव." काका बिचारे सुधारक, त्यातून अमेरिकेचे पाणी चाखून आलेले; प्रत्येकाकडून हे उत्तर मिळालेले ऐकून त्यांचे हृदय कसे पिळवटून निघायचे! वाईला परत येताना एक खोल निःश्वास टाकून ते मला म्हणाले, "खरोखर, हिंदुस्थानातले पुरुष सुसंस्कृत कधी होणार कोण जाणे! शिक्षणानं ह्या कार्याला किती वर्षे लागतीलसं वाटतं तम्हाला?" काकांच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे मी टाळले; कारण सुसंस्कृत काय आणि असंस्कृत काय, आ कोण सुसंस्कृत ह्याबद्दल मला उमजच पडत नव्हता. मी समाजातील गोष्ट फक्त पाहात होते, आणि संस्कृतीची व्याख्या करणे दिवसेंदिवस जास्त जास्त अवघड वाटू लागले होते
 असाच दुसरा एक अनुभव मला आठवला. बालगुन्हेगारांच्या न्यायालयातील गोष्ट. आमच्यापुढे एक तरुण जोडपे हजर झाले होते. नवऱ्याची फिर्याद होती की, बायको सासरी राहत नाही, सारा वेळ माहेरी पळून जाते. बायको म्हणे, नवरा मारतो. नवऱ्याबरोबर त्याच आईबाप व बायकोबरोबर तिचे आईबाप आले होते आणि दोघेही आपापल्या लेकरांना भर देत होती. आम्ही बायकोला नवऱ्याच्या स्वाधीन केले, व त्याच्या कडून लिहून घेतले की, बायकोला मारणार नाही. ते जोडपे व त्यांच्याबरोबरचा परिवार निघून गेला, पण परत पंधरा दिवसांनी ही भांडणारी जोडी माघारी आली. परत त्यांच्या कटकटी चालू झाल्या. मी पाहिले तो नवरा-बायकोत कटकटी चालू झाल्या. मी पाहिले तो नवरा-बायकोत खोड ठेवायला काही जागा नव्हती. तो चांगला जवान वीस वर्षाचा होता; ती शोभेशीच चांगली देखणी, धडधाकट, वयाने सुमारे १४-१५ ची अशी होती. मी विचारले, "काय रे, बायकोला मारतोस का?" तसे तो शरमेने म्हणाला, "मी कशाला मारतो जी? जवा तवा मला कोडताचा धाक दाखवते." तिच्या तोंडावर थोडे तच्छतेचे व विजयाचे हसू झळकले. मी थोडा विचार करून बायकोच्या आईबापांना व नवऱ्याच्या आईबापांना ह्या जोडप्याच्या बिऱ्हाडी यायला बंदी केली. दोघांकडून जामीन लिहूं घेतला आणि नवरा-बायकोला जायला सांगितले. माझा ऑफिसर मला विचारतो, नवऱ्याकडून न मारण्याबद्दल घेतलेला करार संपला आहे, तो परत लिहून घेतला पाहिजे. मी मानेनेच नकार देऊन त्या जोडप्याची बोळवण करून सहा