पान:Paripurti.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२ / परिपूर्ती
 

असतात व मधेच दोन्ही पंख जडपणे झाप मारतात तेव्हा हा ताठपणा म्हणजे लवचिक जिवंत अवयवांनी इच्छेच्या बळावर धारण केलेले व क्षणिक टिकणारे जड अचल रूप आहे ह्याचा साक्षात्कार होऊन मनात काय आनंदाच्या लाटा पसरतात! ती जोडी मंद घिरट्या मारून तळ्याच्या पाळीला उतरली. उतरताना शरीराचा भार काटकुळ्या पायांवर एकदम पडू नये म्हणून लहान लहान उड्या मारून मग ती स्थिर झाली. नेहमीप्रमाणे "कर्र-कर्र-कर्र" करीत दोघांनी वादविवाद केला व तळ्यात जायचे ठरवल. मग एक-एक पाय उंचावून हळूच तळ्याच्या पाण्यात टाकला. काय नखऱ्यान पावले टाकायची! आपले वस्त्र भिजू नये व पाणी वर उडू नये म्हणून साडा सावरून हळूच पाऊल टाकावे ना, अगदी तसेच. पहिली जोडी पाण्यात शिरते न शिरते तोच इतरही जोड्या "कर्र-क्रे" करीत येऊ लागल्या. त्यात समोरच्या झाडावर मोर "म्यांवो, म्यांवो" म्हणून ओरडू लागले व पक्ष्यांच्या आवाजाने सारे अंतराळ भरून गेले. गेल्या वर्षी लांघणज सोडले तेव्हापासूनचा मधला काळ जणू नाहीसा होऊन, कालच्या पुढचा नवा दिवस मी अनुभवीत होते. असा आमचा छावणीवरील जीवनक्रम सुरू झाला.
 दुसऱ्या दिवशी सकाळी आठाच्या आत जेवणे उरकून आम्ही १ आमची कामकरी मंडळी खणतीच्या जागी निघालो, व सर्वांनी मिळून खपून दुपारच्या मधल्या सुटीपर्यंत यंदाचे खणायचे क्षेत्र आखून, खुंट्या ठाकून निश्चित केले. एक तास विश्रांती घेऊन परत कामाला सुरुवात झाली. म्हातारा हिरोजी सर्वांत वडील, त्याच्याजवळ टिकाव दिला व देवाच नाव घेऊन पहिला घाव मारावयास सांगितला. त्यानेही "जै मा-देवजी म्हणून पाहिले डिखळ घाव मारून काढले. सोळा फूट लांब व सहा फूट रुंद अशा चार फुट आंतरवरच्या दोन क्षेत्रात एकदम सरुवात केली. एका खड्डयावर मी काम पाहत होते, दुसऱ्यावर आमचे प्रमुख होते. दिवस संपता संपता थोडीथोडी दगड्याची हत्यारे सापडू लागली. दुसऱ्या दिवशी परत काम सुरू झाले. गेल्या वर्षीप्रमाणेच खूप अवशेष सापडत होते, व आम्ही सारख त्यांची नोंद करीत होतो. पण माणसाचे अवशेष काही मिळाले नाहीत. पहिला खड्डा खूप खोल गेला. सांस्कृतिक अवशेष संपले म्हणून तो टाकून नव्या खड्यात सुरुवात केली. एक दिवस माझ्या खड्यात उभी असताना मला माझ्या नावाने जोरजोराने हाक ऐकू आल्या.वर आले तो माझे सहकारी जवळजवळ धावतच येऊन म्हणाले, "चला, चला लवकर; माणसाची कवटी सापडली