पान:Paripurti.pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महाराष्ट्रात फिरता फिरता अशा किती गौराया
मी पाहिल्या आहेत! किती कष्ट करतात! किती
अधिकार गाजवतात! गौरीचा लाडिकपणा,
गौरीचा भोळेपणा, गौरीचा प्रेमळपणा, सगळे
त्यांच्यात दिसून येते. ती हिमालयाची मुलगी,
तर ह्या सह्याद्रीच्या माहेरवाशिणी. वन्य, राकट,
पण प्रेमळ. आपल्या तापट, रानटी भावांना
संभाळणाऱ्या, आपल्या रागीट नवऱ्यांना
ताळ्यावर आणणाऱ्या, भोळ्या सदाशिवांच्या
डोक्यावर बसलेल्या अशा पार्वत्या सर्व जातींत
सर्व महाराष्ट्रभर दिसतात. त्यांना उत्तरेकडील
सुसंस्कृत रुबाबी-नबाबी बोलणे चालणे माहीत
नसेल, त्यांच्या हास्यात नाजुकपणा नसेल,
त्यांच्या जिभेच्या रासवटपणात प्रेमाचा ओलावा
कोणाला दिसत नसेल तर ते पाहणाऱ्यांचे दुर्दैव.

देशमुख आणि कंपनी (पब्लिशर्स) प्रा. लि.