पान:Paripurti.pdf/138

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


१५२ / परिपूर्ती
 

व्हा, पाणी देऊ का?' अशी विचारणा झाली. माझ्या बाहंत म्हातारीचा देह थरथरत होता. मला आठवण झाली. माझी एक कुत्री होती, तिचे पिल्लू जनावर चावून मेले. तेव्हा ती थरथरत उभी होती. अशीच तिला जवळ घेतली होती व असाच तिच्या शरीराचा कंप मला जाणवत होता. मनात आले, “आपण माणसं जनावरांच्या किती जवळ!" म्हातारी थोड्या वेळाने कापायची थांबली, वेदनेची जाणीव व आविष्कार पाशवी पायरीवर आला. तिच्या मिटल्या डोळ्यांतून धारा वाहू लागल्या. मुक्या दु:खाला वाचा फुटली. तिने आपली हकीकत सांगितली. दु:ख काय? जे इतरांचे तेच तिचे. तिचा एकुलता एक मुलगा भर पंचविशीत गेला होता. ही दु:खे सामाजिक विषमतेमुळे उत्पन्न झाली नव्हती; राजकीय दंगली व युद्ध त्यांच्या बुडाशी नव्हती. ती मानवाबरोबर आलेली व मानवाबरोबर नष्ट होणारी अशी होती, ती रावाला होती, रंकाला होती. तरण्याला होती, वृद्धाला होती. सर्व मनुष्यसमाजाला व्यापून राहिलेली होती. म्हातारी आपली हकीकत सांगून क्षणभर थांबली व एक खोल सुस्कारा टाकून म्हणाली, “पांडुरंगा, तू ठेवशील तसं राह्यचं..." दात-ओठ खाऊन मी पण मनात म्हटले, "तेन त्यक्तेन भुञ्जीथाः।” ह्या लोभी सर्वग्राही मालकाच्या हातून जे सुटेल ते आमचे... “पांडुरंग मोठा कठीण देव आहे बरं! तुमचं मन कुठं गुंतलं तर तो सोडवून टाकतो." पण देवा, ते मन ठायी-ठायी गुंतवतोस का? ते पुर गुरफटून टाकतोस आणि मग क्रूरपणे ओरबाडून त्याच्या चिंध्या-चिंध्या करतोस ह्यात काय मोठेपणा? ह्या असल्या श्रमलेल्या, फाटलेल्या, रक्ताश्रू गाळणाऱ्या हृदयाला फरफटत तुझ्या पायांशी आणण्यात तुला काय धन्यता वाटते? त्यापेक्षा आयुष्याच्या प्रभातकाळी सुखाच्या कोवळ्या उन्हात फुललेले आमचे जीवनपुष्प तुझ्या पूजेसाठी का खुडून नेत नाहीस?
 आता मात्र मला पुरे वेड लागले! त्या म्हातारीच्या तळतळाटाने क्षणभर मला वस्तुस्थितीचा विसर पडला. कोण कोणाला ओढून पायाशा आणणार? सगळा मनुष्याच्या मनाचा खेळ आहे झाले! निराकार, निर्गुण व सर्वस्वी उदासीन तत्त्वातून सगुण परमेश्वर निर्माण करावयाचा, सर्वे कतृत्व त्याच्या माथी मारायचे, त्याला जगाचा मालक बनवायचे आणि मग म्हणायचे, “तेन त्यक्तेन भुञ्जीथ:"
 आम्ही सर्व आपापल्या दु:खदायक विचारात गुरफटलो होतो, इतक्यात एकीने अभंग म्हणावयास सुरुवात केली, “देह जावो अथवा राहो,