पान:Paripurti.pdf/126

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


140 / परिपूर्ती
 

होत्या. काही लोकांत बरे दिसणार नाही म्हणून पाळीत होत्या. पण शहरात निरनिराळ्या लोकांशी नित्य संबंध येणारे ख्रिस्ती, मुसलमान वगैरे लोकांच्या समाजात वावरणारे पुरुषही त्या बायांसारखेच वागत. ह्याचे शल्य मला जास्त वाटे. वारकरी संप्रदाय, बाह्योपचार व दांभिक आचारधर्म ह्यांविरुद्ध संतांचा उठाव, अद्वैताची शिकवण व ह्या सर्वांवर कडी करणारे हल्लीचे शहरी जीवन ह्याचा सोवळ्या-ओवळ्याशी मेळ कसा घालायचा? काही प्रसंग तर मला फारच उपमर्दकारक वाटले. कोठचा मुक्काम ते काही आता आठवत नाहा, पण संध्याकाळी बि-हाडी पोहोचतो तो असे आढळून आले की विहीर जवळजवळ फल्गभर लांब आहे. विहिरीवर जाऊन, हातपाय धुऊन एक लहानशी कळशी भरून आणली. मोटारीतून वळकटी वगैरे आणली व ओसरीवर बसले होते. एवढ्यात ‘सर्व व्यवस्था ठीक झाली ना?" विचारायला बुवा आले. मी म्हटले, “जागा छान आहे, पण पाणी फार दूर हो! पायाचे तर आज अगदी तुकडे पडले... आता पाणी भरायला किती लांब जायचे?' बुवांना कीव आली; त्यांनी एक घागर स्वच्छ घासवून, ताजे पाणी भरून गड्यांकडून आमचे बिहाडी आणून दिली. मी तोंडाने दुवा देत भरपूर पाणी प्याले, पण माझ्याबरोबरच्या माऊल्यांनी स्वतः आणलेले पाणी पिण्यासाठी व चहासाठी वापरले व बुवांनी आणवलेले पाणी फक्त परसाकडे जाण्यासाठी उपयोगिले! त्याच दिवशी पहाटे आम्ही अंधाराच्याच उठून ओढ्यावर स्नानास गेलो होतो. किती तरी लोक तोंड धुवीत, दात घाशीत खाकरत-खोकरत आमच्याभोवती होते. मी कशीबशी अंघोळ केली. त्या पाण्यात मला तोंड धुऊन चूळही भरवेना! ह्या सर्व बायांनी "गंगे! भागीरथी!" म्हणून तेथे आंघोळ केली... अगदी चुळाही भरून तोंडे धुतली, तेव्हा आपल्या शेजारच्या व इतर जातीच्या माणसांच्या खाकरण्याचा ह्यांना विटाळ झाला नाही आणि आता मात्र ह्या आडाच्या स्वच्छ पाण्याचा ह्यांना विटाळ होत होता!
 तीच गोष्ट बोलण्या-चालण्याची. अशाच आम्ही ओढ्यावर अंग धुवत होतो. बरोबर दोन कंदील आणले होते. मी अंग धुवून बाहेर आले तो दुसरा कंदील दिसेना म्हणून इकडेतिकडे चौकशी करू लागले. आमच्यापैकीच काहीजणी मागाहन आल्या होत्या. त्यांनी कंदील परसाकडे जाण्यासाठी नेला होता हे मला व माझ्याबरोबरच्यांना माहीत नव्हते. इतक्यात आमच्यासमोरच एक बाई कंदील हातात घेऊन ओढ्यात शिरली,