पान:Paripurti.pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३६ / परिपूर्ती
 

उरकून बांधाबांध करीत होते. ही झाली मध्यम स्थितीतल्या गृहस्थाश्रमी शेतकऱ्यांची यातायात. दिंडीबरोबर अगदी भणंग लोक पण खूप होते. मिळेल तेथे खायचे, जागा सापडेल तेथे पथारी पसरायची, व पालखी चालू लागली की चालायचे असा त्यांचा प्रघात असे. शिवाय, भिकारी नसूनही उघड्यावर मुक्काम करणारे लांब-लांबून आलेले लोक होते. पाऊस पडला तर फार हाल होतात. सर्वांच्या मलमूत्राची घाण सर्वत्र पसरते; पण यंदा पाऊस सुदैवाने फार पडला नाही. रात्रीच्या मुक्कामाला मुळीच पडला नाही, पण मळभ असल्यामुळे उन्हाचा त्रास होत नव्हता म्हणून लोक सुखात होते.
 मी मराठीच्या आदिकवींच्या पादुकांवर डोके ठेवून बाहेर पडणार तो एका बाईने मला पजा पाहण्यासाठी तंबतच बाजला नेऊन बसवले. दर्शनोत्सुक भक्तांना बाजूला सारून तंबूची प्रवेशद्वारे बंद केली. चांदीच्या ताटात घालून चांदीच्या पादुका पुजाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आल्या. यथासांग पण जरा घाईने प्रवासाला साजेल अशी पूजा होऊन आरती झाली व देवाभोवती मानकरी उभे राहून एक पडदा उभारला गेला. शेजारच्या बाईंना मी विचारले, “हे हो काय?" त्या म्हणाल्या, “देवाला नैवेद्य झाला. देव भोजत करीत आहेत. त्यांना दृष्ट लाग नये म्हणन भोवती पडदा धरला आहे." देवाच्या सगुणत्वाची व साकारत्वाची ही परिसीमा पाहून मी आश्चर्याने स्तंभितच झाले. “पूर्वी खरोखरीच देवाच्या ताटातील लाडू फुटत असे. हल्ली श्रद्धा नाही म्हणून असले साक्षात्कार नाहीत." त्या बाई पुढे म्हणाल्या, मीही मान डोलावून तंबूच्या बाहेर पडले. दर्शनाला येणाऱ्यांची गर्दी परत आत लोटली. “बायांनो, ओवाळणी टाका. ओवाळणी टाका." पालखीजवळचे दलाल ओरडत होते. येणाऱ्यांचे मन देवाच्या पायाशी घोटाळत होते, तर पालखीजवळच्यांचे लोकांच्या खिशावर स्थिरावल ह्या कोंदट वातावरणातून मी झपाट्याने बाहेर पडले तो तुतारी वाजली. साडेसहाला देवांचा मुक्काम न चुकता हालत असे त्याचीच ही सूच मी वाटेवर चालणाऱ्या बायांत मिसळले व पढची वाट काटू लागले.
 सूर्य उगवल्यापासून मावळेपर्यंत मधले दोन-तीन तास वगळून सर्व वेळ चालण्यात जाई. सर्वांत पुढे सामानाने भरलेल्या बैलगाड्या असत.त्यांच्या नंतर शेकडो माणसे गटागटाने, गप्पा मारीत, अभंग म्हणत, भजन करीत जायची व सर्वांत मागून मुख्य मिरवणूक असायची. पहिली दिंडी अस्पृश्यांची, मग देवाचे घोडे, त्यांच्यामागन शेकडो डोंडेवाले व मागून इतर