पान:Paripurti.pdf/120

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


१३४ / परिपूर्ती
 

मागे टाकून पूर्व महाराष्ट्राच्या पठाराची चिन्हे दिसू लागली होती. तरी मधूनमधून टेकड्या व जरा मागे मोठाले डोंगर दिसत होते. यंदा इकडील भागात रोहिणीचा पाऊस खूप पडला होता, म्हणून मधेच किंचित ओलावा होता व वातावरण प्रसन्न होते. निरनिराळ्या अभंगांचे शब्द अधूनमधून कानांवर पडत होते. “वेगे आणावा तो हरि...” “लावोनिया हात कुरवाळिला माथा...” “ये ग, ये ग विठाबाई..." एवढ्यात सर्व दिंड्या थांबल्या. का बरे? शेजारची बाई म्हणाली, "उभं रंगण आहे म्हणून." तिच्या शब्दाचा अर्थ मला कळला नाही. पण बाकीचे काय करतात ते आपण करावे म्हणून मी उभी राहिले. पालखीपुढे चालणारा सर्व समाज दुभागून रस्त्याने दुतर्फा उभा राहिला. मध्ये दहा फूट जागा ठेविली होती. “जय जय विठोबा रखुमाई" तालावर सुरू झाले. टाळ जोराने वाजू लागले. मृदुंग पहिल्याने धीमे धीमे व मग भराभर नाद देऊ लागला. म्हणणारे लोक तालावर जागच्या जागी पावले टाकू लागले, म्हणण्याची लय हळूहळू वाढू लागली- दुगण झाली चौगण आता वाढणार तरी किती? नाचणाऱ्या लोकांमागे बघणारा स्त्रीसमाज होता. त्यांचीही अंगे आपसूक तालात हलू लागली. इतक्यात तांबूस रंगाच्या घोड्यावर बसलेला व रुप्याच्या काठीत बसवलेले निशाण घेतलेला एक स्वार व त्याच्यामागून मोकळा घोडा हातात धरलेला एक इसम असे दौडत पालखीपर्यंत गेले. घोड्यांनी पालखीशी डाके ठेवले, व स्वार व रिकामा घोडा आले तसे दौडत परत गेले. “पाहिलत मुक्या जनावरालासुद्धा किती भक्तिभाव असतो तो?" माझ्या शेजारच्या बाई म्हणाल्या. “पण हे घोडे कसले पालखीबरोबर?" मी विचारले. माझ्या अज्ञानाची कीव करीत त्यांनी सांगितले, "तो रिकामा पांढरा घोडा आहे ना... पुढे चालतो तो? तो देवाचा. त्यावर रेशमाचं खोगीर आहे व मागून निशाण घेऊन बसलेला स्वार येतो तो देवाचा स्वार. हे दोन्ही घोडे सरदार शितोळ्यांनी देवाला (ज्ञानेश्वरांना) दिलेल्या सरंजामापैकी आहेत," मी "ठीक" म्हटले. एवढ्यात रंगण आटोपून पालखी परत मार्गी लागली.
 रात्रीचा मुक्काम लवकरच आला. एका वाड्याच्या ओसरीवर व अंगणात आम्हाला जागा मिळाली होती. शेजारच्या मोठ्या वाड्याच्या सोप्यात बाकीची मंडळी होती. सकाळच्या बांधून आणलेल्या भाकऱ्या पोळ्या व चटणीवर संध्याकाळचा फराळ आटोपला व आम्ही बिछाने पसरले. पुरुष मंडळींना काहीतरी फराळाचे केले होते. पण ती येण्याचे आतच