पान:Paripurti.pdf/116

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


परिपूर्ती / १२९
 

मराठीत म्हणाली, “माझ्या लेकरा, सर्व खरं सांग." "बरं का आई, मी तिला इचारलं कशापायी मला नेतीस?"... आमचा प्रोबेशन ऑफिसर मध्येच म्हणाला, “अग, 'आई'- काय चालवलं आहेस? 'बाई' म्हण." माझी सहकारिणी गदगद स्वराने म्हणाली, "छे:! छे:! प्रभूनंच त्या मुलीच्या जिभेला तसं बोलावयास लावलं... प्रभूनंच ही लेकरं मला दिली आहेत." आता वत्सलरसाच्या पाटात सगळे कोर्ट बुडून जाईल ह्या भीतीने मी त्या मुलीच्या बापाला पुढे बोलावले व त्याने सुरुवात केली- “कसं दोन्ही काऱ्यांनी संगनमत केलं, बाई....” केस पुढे चालू झाली. मी माझ्या सहकारिणीला अगदी जैन धर्मीयांप्रमाणे निदान (मरणापूर्वीची तीव्र इच्छा) केले.... “बाई ग, पुढच्या जन्मी पाच पांडवांची राणी नि शंभर कौरवांची आई हो!"