पान:Paripurti.pdf/115

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


१२८ / परिपूर्ती
 

गावच्या दुसऱ्या एका सावकाराच्या मुलाशी केले. तो श्रेष्ठिपुत्र रात्री शय्यागारातून धावत बाहेर आला व त्याने आपल्या बापाला सांगितले की, "बाबा, ह्या मुलीबरोबर मी राहणे शक्य नाही. हिला हाकलून द्या." ती अभागिनी बिचारी रडत-रडत लग्नाच्या रात्रीच बापाच्या घरी परत आली. बापाने काही दिवसांनी परगावी जाऊन तेथे तिचे लग्न करून दिले, पण परत तोच प्रकार झाला. असे दोन-चारदा झाल्यावर बापही तिच्यावर रागावला व त्याने तिला घराबाहेर काढून लावले. तिच्या रूपाला भाळून पुष्कळ तरुणांनी तिला आसरा दिला. पण पूर्ववत तिला बाहेर पडावे लागले. शेवटी तिने एका जैन साधूचा उपदेश घेतला व ती श्राविका होऊन गावोगाव भिक्षा मागत व जिनाचे चिंतन करीत हिंडू लागली. सरतेशेवटी ती एका गावी आली. तेथे तिने आपल्या कष्टप्रद निष्फळ जीवनाचा त्याग करण्याचा निश्चय केला व जैन संप्रदायाप्रमाणे उपास करण्यास सुरुवात केली. ती अत्यंत क्षीण झाली. त्या गावच्या उद्यानात एका मोठ्या झाडाखाली बसून ती आयुष्याचे क्षण मोजीत होती. इतक्यात शेजारीच तिला मोठ्याने हसणे व बोलणे ऐकू आले. तिच्या क्षीण डोळ्यांना दिसले की, त्या गावची सुप्रसिद्ध रूपवती वेश्या उद्यानात विहार करीत आहे व त्या गावाचे पाच सुस्वरूप तरुण तिच्या प्रसादाचा याचना करीत तिच्याभोवती भुंग्यासारखे घोटाळत आहेत. अभागिनीच्या मनात आले, 'हाय दैवा! तिला एका वेळी पाच मिळावे आणि माझ्या वाट्याला जन्मात एकसुद्धा येऊ नये?' हा विचार तिच्या मनात येतो तोच तिचा प्राण गेला. मात्र मनाच्या सकाम अवस्थेत देहावसान झाल्यामुळे तिला मुक्ती न मिळता तिला पुनर्जन्म मिळाला व ती दोवई म्हणून जन्माला येऊन तिला पाच पती मिळाले.
 आमच्यापुढची ती केस थोडा वेळ चालून थांबली व नव्या केसला सुरुवात झाली. ती होती एका लहान मुलीचीच. तिला बाप व एक लय झालेली बहीण होती. सर्व माणसे होती ख्रिस्ती. बापाने त्या लहान पाराव लग्न करण्याचा घाट घातला होता. पण ख्रिस्ती बहिणीने तिला पळवून नेऊन आमच्यापुढे आणले होते- बाप पोरगी परत मागत होता. मुलगी फार लहान आहे, एवढ्यात लग्न होऊ नये, असे बहिणीचे म्हणणे होते. ती लहान मुलगी आपली हकीकत सांगत होती. सांगता सांगता ती माझ्या सहकारिणाकडे वळून म्हणाली, "हे बघा, आई, मला माझ्या बहिणीनं संग आणल." माझ्या सहकारिणीला वात्सल्याचे भरते आले. ती आपल्या मिशनरी