पान:Paripurti.pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
परिपूर्ती / १२७
 

करावे लागले तिला." ती थांबली- मी काहीच बोलले नाही, पण माझ्या प्रश्नार्थक मुद्रेला तिने उत्तर दिले, “एक सबंध रात्र अशा बाईच्या सहवासात काढणे, म्हणजे विचित्र नाही का? रात्रभर मला झोप आली नाही. कोर्टापुढे तिच्याबद्दल आलेल्या माहितीचा मी विचार करीत होते-" तिने एक दीर्घ श्वास घेतला व मला विचारले, “ह्या खटल्यासाठी आपल्याला तिच्या घरी जाऊन जागा पाहावी लागेल का?" “काही कारण दिसत नाही." मी शक्य तितक्या निर्विकारपणे उत्तर दिले. माझ्या उत्तराने तिच्या चेहऱ्यावर निराशेची एक सूक्ष्म छटा चमकून गेली. सुदैवाने ती बोलली नाही. ती स्वत:च्याच विचारात गुरफटून गेल्यासारखी दिसली. नेहमी तिच्या चेहऱ्यावर स्वत:बद्दल एक प्रकारचा आत्मविश्वास दिसे. चुकलेल्या जगाला सन्मार्ग दाखविण्यासाठी आपला जन्म आहे अशी तिची ठाम समजूत होती. तिने आपले आयुष्य ख्रिस्ताला वाहिले होते व सेंट पीटरच्या वहीत पुण्याच्या सदरात आपल्या नावाने सारख्या रकमा जमा होत आहेत त्याबद्दल तिला शका नव्हती. तिला संसार नव्हता. मग संसारातली सुख-दु:खे ती काय अनुभवणार? पण त्यांच्यात तिला अवीट गोडी वाटत होती. ती इतरांच्या संसारांच्या बारीक-सारीक बाबी अगदी अधाशीपणे ऐकायची.... अर्थात, ते केवळ त्यांना सन्मार्ग दाखविण्यासाठीच असे. ती मला दरवेळी बजावायची. आज मात्र तिच्या चेहऱ्यावर केवळ आत्मतुष्टी नव्हती. अमके पुस्तक वाचू नकोस असे सांगितले असताना ते पुस्तक अचानक हाती पडावे, घाईघाईने ते वाचावे, कधी कल्पना नव्हती असे त्यातले काही तरी अर्धवट आपल्याला कळावे- म्हणजे आपली जी मनोवृत्ती होते तशी तिची झाली होती. थोडी शरम, थोडी भिती, अज्ञात प्रदेशात पाऊल घातल्याचा अभिमान असे तर तिला वाटत नसावे? काल रात्री तिला तिच्या उपाशी कौमारहृदयाने त्या वेश्येच्या संगतीत कसली बरे चित्रे रंगविली असतील? माझ्या शब्दांत सांगण्यापेक्षा एक जुनी गोष्टच सांगितलेली बरी.
 ही गोष्ट द्रौपदीच्या जन्माबद्दलची आहे. ती मध्ययुगीन जैन वाङ्मयात आढळते, विलायती फ्रॉईडच्या पूर्वजन्मींच्या भारतीय अवताराने सांगितलेली ती कथा अशी: एका नगरात एका श्रीमान सावकाराला पूईगंधा (कोणी तिचे नाव सुकुमालिया असेही सांगतात.) नावाची अतिरूपवती मुलगी होती. तिच्या रूपाला भाळून पुष्कळांनी तिला मागणी घातली. योग्य वेळी त्या सावकाराने मोठ्या थाटाने व पुष्कळ पैसा खर्चुन मुलीचे लग्न त्याच