पान:Paripurti.pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
परिपूर्ती / १२५
 

संबंधापासून पापात जन्मलेले हे पोर आता अशा घरात राहणे योग्य नाही. छे! छे:! तिला सरकारने ताब्यात घेऊन आमच्या मिशनच्या बोर्डिंगात ठेवावे. तो माणूस आमच्या मिशनच्या पंथाचाच ख्रिस्ती आहे. पाच वर्षे तो मिशनशेजारीच राहतो व आमच्या चर्चमध्ये येतो आहे; काय लबाड आहे तो! आज त्याच्या गावची बाई आली होती; तिने सांगितले की, त्याचे लग्न झाले नाही म्हणून." आता मी पण हट्टाला पेटले. “मी हा खटला हातात घेणार नाही. ज्या घरी मूल आहे तेथे त्याचे पालनपोषण नीट होत आहे. आईबाप निर्व्यसनी व सुस्वभावी आहेत. केवळ त्यांचे लग्न झाले नाही ह्या भानगडीशी मला कर्तव्य नाही. तुमच्या चर्चतर्फे त्याच्याविरुद्ध काय इलाज करायचा तो करा, पण हिंदी सरकारने लोकांच्या घरी जाऊन त्यांच्या संसारात लुडबूड करायला मुलांचे कोर्ट नेमले नाही.” मी निक्षून सांगितले. “दुसरे, तुमची कार्यकारिणी काही कोर्टाची ऑफिसर नव्हे; तिने परत येथे येता कामा नये.' शेवटी दोन-तीन तासांच्या हुज्जतीनंतर ती केस काढून टाकली, पण आमची मने एकमेकांविषयी कलुषित झाली ती कायमची. तिला वाटे, मला नैतिक दृष्टिकोन व धार्मिक भावनाच नाहीत. मला वाटे ते थोडक्यात सांगण्यासारखे नाही, पण ती व तिची कार्यकारिणी अशा दोघीजणी जेव्हा निरनिराळ्या कुटुंबातील भानगडींबद्दल बोलायच्या तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरची हावरी उत्सुकता पाहन मला शिसारी येई एवढ मात्र खरे.
 एकदा आमच्यापुढे एक जरा गुंतागुंतीचा खटला होता. एका अल्पवयीन मुलीला फूस लावून नेल्याबद्दल एका तरुण वेश्येवर खटला होता. त्या वेश्येने आपल्या वतीने बॅरिस्टर दिला होता. तिच्यावर गुन्हा शाबीत हाणं कठीणच होते. कारण तिच्याविरुद्ध साक्ष द्यायला कोणी तयार नव्हते. ज्या पोरीला सोडवून आणली होती ती इतकी भेदरलेली होती की, ती काटोपुढे आली की, त्या वेश्येला व तिच्या साथीदारांना पाहून थरथरा कापायची. पोलिसांना ती बाई जामिनावर सोडायची नव्हती. दुसऱ्या दिवशीच्या साक्षी होईपर्यंत ताब्यात ठेवायची होती. बाईला चोवीस तासांपुरते जामिनावर सोडावे म्हणून बॅरिस्टर कोर्टाची विनवणी करीत होते. ती आपली विडा चघळीत मजेत उभी होती. क्षणाक्षणाला क्लार्क, प्रोबेशन ऑफिसर व मॅजिस्टेट ह्यांच्याकडे बघून मंद हास्य चालले होते तिचे. बॅरिस्टरचे म्हणणे होते की, पोलीस बाईला वाईट वागवतील, बाईमाणूस