पान:Paripurti.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२४ / परिपूर्ती
 

चीज करणाऱ्या धर्माची मी. ख्रिस्त हा एकच प्रेषित व त्याचा धर्म सर्वांनी स्वीकारावा असा तिचा अट्टाहास तर कोणी कोणत्या का धर्माचा असेना, मला काय त्याचे, अशी माझी वृत्ती. खरे पाहिले तर तिचा धर्म तिच्याजवळ व माझा धर्म वा मते माझ्याजवळ. दोघींना एकत्र काम करण्यास काहीच हरकत नव्हती. पण हळूहळू आमचे जमेनासे झाले एवढे मात्र खरे.
 त्यांच्या चर्चची एक कार्यकारी बाई होती. तिचे कार्य म्हणजे तिला नेमून दिलेल्या वस्तीतील घरांवर नजर ठेवायची, त्यांच्या घरी वेळीअवेळी जाऊन कुटुंबातील माणसे काय करतात ते पाहून ती बातमी पाद्याला कळवायची. लहान मुलांचे कोर्ट म्हणजे ख्रिस्ती चर्चचा एक विभाग अशी तिची समजूत होतीसे दिसले. दर आठवड्याला ती निरनिराळी मुले कोर्टात आणायची- कोणाचा बाप दारू पितो म्हणून, कोणाची आई भटकते म्हणून, कोणाचे आईबाप भांडतात म्हणून. ह्या हेरगिरीबद्दल दरवेळी तिला माझ्या सहकारिणीकडून शाबासकी मिळे. मी मात्र दरवेळी ह्या खटल्याबद्दल भांडत असे. “अहो, पुण्यात अशा त-हेने घरोघर हिंडले तर इतकी मुले कोर्टात खेचावी लागतील की, १०० मॅजिस्ट्रेट व ५० कोर्ट मिळूनही काम सपणार नाही. का अशा भानगडी तुम्ही आणता?" तिला ते कधी पटायचे नाही. एक दिवस एक जोडपे व एक मुलगी ह्या कार्यकारी बाईने आणला. मी विचारले, “भानगड काय? मुलीला मारझोड होते, का अन्न मिळत नाही, का तिने गुन्हा केला?" "ह्यापैकी काहीच नाही." कार्यकारी बाई म्हणाली, “पण त्यापेक्षाही भयंकर प्रकार आहे. ह्या गृहस्थाचे नाव जोसेफ, हा बाई सेरा, ही दोघेजण अमक्या घरात राहतात व त्यांना हे सात वर्षाचे लेकरू आहे.' नंतर ती माझ्यापुढे वाकली व पुटपुटली, “अहो, त्या दोघांचे लग्न झाले नाही! तिचे सर्वांग शहारले. मी माझ्या सहकारिणीकडे पाहिले, तिचेही तोंड अगदी गंभीर दिसत होते. खटल्यातील इसमाला पुढे बाल मी विचारले, “काय हो, किती वर्षे तुम्ही सध्याच्या घरी राहता? पाच वर्ष?" "मुलगी कितवीत आहे?' "तिसरीत.” “पगार पोटापुरता मिळतो ना?” “हो.” “काही कर्जबिर्ज?" "मुळीच नाही." बाईला विचारले. तिने सांगितले की, “आमचा भांडणतंटा काही नाही." "मग ह्या पोरीला आणले तरी कशाला इकडे? मी त्रासून सहकारी मॅजिस्ट्रेटला विचारले, तर ती मला म्हणते, “म्हणजे? ह्या कोवळ्या निष्पाप अर्भकाला अशा पातकाच्या खाईत राहू द्यावयाचे की काय! बिनलग्नाच्या अपवित्र