पान:Paripurti.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११८ / परिपूर्ती
 

कोणाला पाच, दहा, कोणाला बारा मुले झालेली आणि त्यांतील निम्मीशिम्मी जिवंत हे उत्तर यावयाचे! ह्या कृश, अर्धपोटी जीवांना एवढी मुले होतात तरी कशी? त्यातून ते जिवंत तरी कसे राहतात? पुरुषांचा ७० - ७५ रुपये पगार एवढ्या संसाराला पुरतो कसा? हे सर्व लोक खातात तरी काय?... अशी परिस्थिती असूनही त्या प्रांतातील लोकसंख्या सारखी वाढत होती. किनाऱ्यावरचे काम संपवून आम्ही पुढे निघालो. दुपारी बारा वाजतासुद्धा सूर्याचा प्रकाश संध्याकाळसारखा वाटत होता. अशा अरण्यातून जाता जाता मध्येच एक मोठा मोकळा प्रदेश दिसला. प्रचंड वृक्षांचे जळके बुंधे तेवढे उरले होते. बायका-पुरुष तेही खणून टाकायच्या उद्योगात होते. जरा पुढे गेलो तर जंगल जाळून साफ केलेल्या जागेत नवी शेती झाली होती. कोठे बटाटे व टापिओकाचे पीक लावले होते. किनाऱ्याजवळ शेतीत माणसांची पोटे भरत ना म्हणून सरकार पर्वतराजीवरील जंगले कापून शेतकऱ्यांना लागवडीसाठी नवीन जमीन देत होते. वाढत्या तोंडांची भूक भागवायची असा पण केला तर त्रावणकोरमधली अरण्ये साफ होऊन तेथे पूर्व महाराष्ट्रातल्यासारखे उघडेबोडके डोंगर दिसू लागायला एक शतकाचासुद्धा अवधी नको.
 फक्त त्रावणकोर-कोचीनच्या तबकड्यांतून जीव वाढताहेत असे नाही. ह्या प्रयोगशाळेत ठिकठिकाणी अशा तबकड्या आहेत व त्यातून सर्व त-हेचे जीव भराभर वाढत आहेत. पुरी जिल्हा व चिल्का सरोवर ही डोळ्यांनी पाहावयास पृथ्वीवरील स्वर्गासारखी आहेत. पुरी जिल्हात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असंख्य जलसंचयांवरून कमळाच्या पानांचे दाट आवरण असते व त्यांत निळ्या, जांभळ्या, पिवळ्या, तांबड्या रंगांची कमळे उगवलेली असतात. जसे रंग विविध तसे आकार पण विविध. बचकेत मावणार नाही एवढ्या मोठ्या कमळापासून तो सदाफुलीच्या फुलाएवढी चिमुकली कमळे त्या पाण्यात चमकत असतात. कमळ्यांच्यामागे हजारो एकर जमिनीवर भाताचे पीक डोलत असते. आश्विनाच्या महिन्यात ते इतके दाट असते की, हिरव्या-पिवळ्या गालिच्यात मुळी फटसुद्धा दिसत नाही. मध्ये खंड असलाच तर आंबा, केळी, पुन्नाग व नारळीच्या बागांचा. चिल्का सरोवराचे काठी भातशेती व बागाईत तर आहेच; पण शिवाय सरोवरात मासे उत्तम मिळतात व ते ताजे मिळावे म्हणून लोक मुद्दामसुट्टीत येथे येऊन राहतात. चिल्काच्या अथांग जलाशयावर सूर्योदय अतिरम्य