पान:Paripurti.pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
परिपूर्ती / ११७
 

शिकवणारे अध्यापक जणू ह्याच संधीची वाट पहात होते. ते म्हणाले, “अगदी बरोबर; पण सृष्टीमध्ये जीवांच्या वाढीला काही सर्व गोष्टी अनुकूल नसतात. ज्या डबक्यातून ह्या प्रयोगशाळेत पहिले जीव आणले ती उन्हाळ्यात वाळली की कोट्यवधी जीव मरून जातात. सांदीकोपऱ्यात थोड्याशा चिखलात काही जिवंत राहतात. खूप थंडी पडून पाणी गोठले तरी बरेच जीव मरतात. पाण्यात काही विषार गेला तरी मरतात. जीवोत्पत्ती जास्त होऊन डबक्यातील पाण्यात पुरेसा अन्नरस राहिला नाही तरी लाखोंनी मरतात आणि शेवटी म्हणजे दुसरे निरनिराळे सूक्ष्म जंतू ह्या डबक्यातील जावाना खायला टपलेले असतात." त्यांनी लगेच गड्याकडून एक बादली आणली व तीतले थोडे थोडे पाणी नव्या तबकड्यात घालून वर्गाला परत सूक्ष्मदर्शकातून पाहण्यास सांगितले. आता तबकडीत फक्त अन्नरस व त्यावर पोसणारे एक-दोन जीव असे दृश्य नव्हते. तबकडीत नाना त-हेच्या सूक्ष्म वनस्पती व प्राणी पाण्यात इकडून तिकडे. फिरत होते. काही खाऊन खाऊन लठ्ठ होत व नंतर नवी जीवोत्पत्ती होई. पण खाणे थोडे म्हणून जीवोत्पत्ती भराभर न होता फारच सावकाशीने होत होती. तेवढ्यात दुसराच एक सूक्ष्म जीव येऊन त्याने नव्या प्रजेला खाण्यास सुरुवात केली व नव्यानेच जन्माला आलेल्या त्या अणमय जीवांची पळायची धडपड सुरू झाली. त्या जीवभक्षक जीवाला खाणारेही जीव त्या तबकडीत होते. शिवाय, एकमेकांना खाऊन भक्ष्य संपले म्हणजे भक्षकही उपासमारीने मरायच्या पथाला लागे आणि शेवटी पाहता-पाहता तबकडीतले पाणी संपले की, सगळ्याच जीवांची धडपड बंद पडायची- तबकडीतल्या विश्वावर मृत्यूची शांतता पसरायची.
 त्या प्रयोगशाळेतले प्रयोग मोठ्या प्रमाणावर डोळ्यांपुढे चाललेले आज दिसत होते- परुष-बाया येऊन आपली तपासणी करून घेऊन व विचारल्या प्रश्नांची उत्तरे देऊन पढे चालले होते. “उंची चार फूट अकरा इच; पाच फूट तीन इंच..." एक माणस उंचीची मापे सांगत होता; "वजन अठ्याऐशी पौंड; शहाण्णव पौंड: एकशे एक पौंड..." शंभरावर वजन एकल की लिहून घेणारा डोळे वर करून, “आहे तरी कोण पैलवान!" अशा बुद्धान वर पाही. छातीचा घेर, श्वासोच्छवासाचा जोर, स्नायूचा जोर अशी एक-एक तपासणी होत होती. ती झाली म्हणजे लग्न कधी झाले; मुले किती झाली? मेली किती? जिवंत किती?' अशी प्रश्नावली सुरू होई. वयाप्रमाणे