पान:Paripurti.pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११६ / परिपूर्ती
 

जीवांच्या अनंत तोंडांनी शोषण होऊन क्षीरोदधी कोरडा पडण्याची वेळ आलेली असते. एकावर एक जिवांचे थरचे थर रचल्यासारखे झाले आहेत, खालचे जीव हालचाल न करता आल्याने गुदमरून जातात, तर वरच्यांचे अंग कोरडे पडून ते सुकून जातात. अशी परिस्थिती काही वेळ राहू दिली तर तबकडी पार कोरडी पडून सर्व जीव मरून जातील. पण प्रयोगशाळेतील विद्यार्थी अर्धा चमचा गोड पाणी किंवा अन्नरस तबकडीत टाकतो. शेवटच्या काही मिनिटांतील भयानक जीवनकलहातून जिवंत राहिलेले चार-दोन जीव हालचाल करू लागतात; स्वबांधवांच्या मढ्यांनी अधिकच पोषक बनलेल्या नव्या जीवनरसाचे शोषण करतात; युगचक्राला व निर्मितीला परत जोमाने सुरुवात होते. जोपर्यंत सर्वांना पुरेसे अन्न मिळते, तोपर्यंत संख्येची वाढ झपाट्याने यंत्रासारखी चालते; पण अन्नरस कमी व जीव जास्त अशी स्थिती झाली की, निरनिराळ्या तबकड्यांतील जीवांची हालचाल पाहण्यासारखी असते. पहिल्याने एकमेकांना ढकलण्याची धडपड सुरू होते- त्यात बरेच मरून तबकडीत पुरेशी जागा झाली की थोडा वेळ परत शांततेने प्रजनन चालू होते, पण त्यातही पूर्वीचा सुरळीतपणा दिसून येत नाही. विशेषतः तबकड्यातील सूक्ष्म जीव बहुपेशीमय असले तर बदललेल्या परिस्थितीचा परिणाम त्याच्यावर चटकन दिसून येतो. काही साश्य कारण नसता एकदम सर्व जंतू सैरावरा पळू लागतात, एकमेकांवर आदळतात, चिरडतात व मरतात. जणू तबकड्यातील सर्व जीवांना भुताटकीने झपाटलेले आहे अशा त्यांच्या हालचाली असतात. कधीकधी सर्व जीव काही हालचाली न करता मतमय स्थितीत पसरलेले दिसतात. त्यांचे जीवन घड्याळासारखे सुरळीत न चालता त्यात काहीतरी उलथापालथ होतेसे पाहणाराला वाटते. प्रयोगशाळेत काही तबकड्यातून दर तासाने जीव काढून दुसऱ्या तबकड्यात ठेवतात व नवा अन्नरस देतात.अशा जीवांची संख्या वाढतच असते. हवा, योग्य उष्णता व भरपूर अन्न यांचा त्यांना पुरवठा असतो. बाहेरचे शत्रू नाहीसे झालेले असतात. अंत:कलाहाची परिस्थिती येण्याच्या आतच नवे अन्न व नव्या तबकड्या वसाहतीसाठी मिळत जातात व सारखी न थांबता जीवांची संख्या वाढत जाते. मरण जणू आपले कार्य विसरून गेलेले असते. ह्या कृत्रिम सृष्टीत जननाचीच काय ती परवानगी असते.
 "अशा प्रकारचे हे जीव वाढायला लागले तर थोड्या महिन्यात व्यापून टाकतील!" एक विद्यार्थी सूक्ष्मदर्शकातून पाहता पाहता उदगारला.