पान:Ganitatalya gamatijamati.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७०
गणितातल्या गमती जमती



 प्रश्न २ : जन्मतारीख ओळखा : पार्टी १ जानेवारीला भरली होती आणि अभिजितचा वाढदिवस ३१ डिसेंबरला होता.

 आपण असे समजू की अभिजितने आपलं विधान १ जानेवारी १९७८ ला केलं. 'परवा मी १५ वर्षाचा होतो' - म्हणजे ३० डिसेंबर १९७७ ह्या दिवशी त्याचे वय १५ पूर्ण असून, तो १६ व्या वर्षांत होता. हे १६ वे वर्ष ३१ डिसेंबर १९७७ ला पूर्ण झाले. त्याचप्रमाणे ३१-१२-७८ ला तो १७ चा आणि ३१-१२-७९ ला १८ चा होणार. ज्या अर्थी तो १९७८ मध्ये हे संभाषण करत होता त्या अर्थी ‘पुढच्या वर्षी म्हणजे १९७९ संपेपर्यंत त्याला १९ वें वर्ष लागणार !

 प्रश्न ३ : बाप से बेटी सवाई : लीलावतीने निवडलेला मार्ग असा : ती त्या दोघा चॅम्पियन्सशी वेगवेगळ्या खोलीत, वेगळ्या पटांवर खेळली - एकाबरोबर 'काळी’ बाजू घेऊन तर दुसऱ्याबरोबर ‘पांढरी’ बाजू घेऊन. पहिल्या चॅम्पियनने जी सुरुवात केली ती तिने दुसऱ्या विरुद्ध वापरली आणि दुस-याचं उत्तर पहिल्या विरुद्ध वापरलं. हा मार्ग तिने शेवटपर्यंत वापरला ! त्यामुळे वास्तविक खेळ त्या दोघा चॅम्पियन खेळाडूंतच होत असून जर त्यात पहिला जिंकला तर लीला दुस-या पटावर जिंकणार. जर दुसरा जिंकला तर लीला पहिल्या पटावर मात करणार आणि खेळ ‘ड्रॉन' झाल्यास तिची दोनही पटांवर बरोबरी होणार.

 प्रश्न ४ : हे जमेल का? कोप-यातले दोन चौकोन कापल्यामुळे पटावर ३० पांढरे आणि ३२ काळे चौकोन उरले. झाकायच्या लांबड्या पट्टीने प्रत्येकी एक काळा आणि एक पांढरा चौकोन झाकला जातो. म्हणून ३० पांढरे आणि ३२ काळे चौकोन झाकता येणार नाहीत.

 प्रश्न ५ : शंटिंग करा : खालील चित्रांच्या मदतीने ह्या प्रश्नाचे उत्तर समजणे सोपं होईल. प्रथम डाव्या बाजूच्या रुळांवरला डबा - २ इंजिनाच्या मदतीने ‘क’ ह्या भागावर पोचवावा. इंजिन परत पहिल्या जागी आणावे. पहा चित्र क्रमांक १.