पान:Ganitatalya gamatijamati.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१७. ‘त्या’ प्रश्नांची उत्तरे

लेखांक १५ मधील प्रश्नांची उत्तरे

 प्रश्न १ : वय ओळखा : ३६ ह्या आकड्याचे तीन गुणक किती प्रकारे पाडता येतील? एक नमुना म्हणजे ३६ = २ x ३ x ६. जर त्या तीन मुलांची वये २, ३, ६ असती तर त्या वयांची बेरीज २ + ३ + ६ = ११ इतकी भरते. जर शेजारचा घरनंबर ११ असेल तर विक्रेत्याने मुलांची वये २, ३, ६ अशी सांगितली असती - कारण ३६ चे ३ गुणक सर्व प्रकारे पाडून पाहिले तर फक्त एकाच प्रकारात (म्हणजे वर सांगितल्याप्रमाणे) त्यांची बेरीज ११ भरते. ज्या अर्थी घर नंबर पाहूनसुद्धा विक्रेत्याला पेच पडला त्या अर्थी घरनंबर ११ नव्हता ! जर ३६ च्या तीन गुणकांची - ते वेगवेगळ्या प्रकाराने पाडले असले तरी - बेरीज तितकीच होत असेल तर विक्रेत्याला प्रश्न पडणे साहजिक आहे. म्हणून उत्तर शोधण्यासाठी ३६ चे ३ गुणक वेगवेगळ्या तहेने पाडून पाहा. असं दिसून येईल की फक्त (२, २, ९) आणि (१, ६, ६) हे गुणकच असे आहेत की त्यांची बेरीज सारखी भरते. म्हणजे घरनंबर १३ असणार. मुलांची वये २, २, ९ किंवा १, ६, ६ असणार. पण घरमालकिणीला ‘सर्वात मोठी’ मुलगी ज्या अर्थी होती त्या अर्थी त्या मुलीचे वय ९ होते. (६, ६ ही जुळ्यांची वये होतात !) म्हणून विक्रेत्याने २, २, ९ हा पर्याय निवडला. म्हणून मुलांची वये २, २, ९.