पान:Ganitatalya gamatijamati.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०
गणितातल्या गमती जमती


 “तरीसुद्धा तू मला कधीच पकडू शकणार नाहीस." कासव म्हणालं, “फार काय मी हे तुला गणितानं सिद्धच करून दाखवतो. मग आपल्याला पळायची जरूरच नाही”

 “दाखव” ससोबा म्हणाले. पण मनातून त्यांना जरा भीती वाटली. कारण कासवाच्या डोकेबाजपणाबद्दल वाद नव्हता.

 “हे पाहा, मी तुझ्यापुढे १०० यार्ड असणार सुरुवातीला. तुला प्रथम हे शंभर यार्ड अंतर भरून काढायला पाहिजे. कबूल?”

 “कबूल." - ससा.

 “तोपर्यंत मी काही स्वस्थ बसणार नाही - मी पण पुढे गेलो असेन." कासव म्हणाले.

 “पण तू काही माझ्याइतका जोरात पळणार नाहीस. तू फक्त १० यार्डच पुढे गेलेला असशील.” - ससा लगेच म्हणाला.

 “पण हे १० यार्ड तुला भरून काढावे लागतील आणि तोपर्यंत मी आणखी एक यार्ड पुढे गेलो असेन. ते अंतर तू भरून काढेपर्यंत मी पुन्हा पुढे जाईन. ते अंतर भरून काढेपर्यंत मी आणखी पुढे गेलो असेन. नाही का?” - कासव.

 “पण मी केव्हातरी तुला पकडेनच !” ससा किंचित् गोंधळून म्हणाला.

 “पण केव्हा? कारण मी आता सांगितल्याप्रमाणे तू नेहमीच माझ्या मागे असणार ! तू माझ्या पूर्वीच्या जागी येईपर्यंत मी थोडा तरी पुढे जाणारच !”

 सशाला ह्या युक्तिवादावर उत्तर सापडेना. तुम्हाला तो पटतो का?

तर्कदोष (Fallacy)

 गणित हा तर्कशास्त्रावर अवलंबित असलेला विषय आहे. काही नियम गृहीतक म्हणून धरून त्यावरून, तर्कशास्त्रीय प्रणालीचा वापर करून निष्कर्ष काढायचे हा गणितज्ञाचा प्रयत्न असतो. पण जर ही तर्कशास्त्रीय प्रणाली कुठे चुकली तर चुकीचे निष्कर्ष निघतात. वर सांगितलेल्या गोष्टीत कासवाच्या युक्तिवादात तर्कदोष आहे.