पान:Ganitatalya gamatijamati.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लांबी, क्षेत्रफळ आणि घनफळ
४५



‘योग्य आकार असणे :

 वरील शीर्षकाचा एक लघुनिबंध प्रख्यात प्राणिशास्त्रज्ञ प्रोफेसर जे. बी. एस. हॉल्डेन यांनी अनेक वर्षापूर्वी लिहिला असून त्यात वरी उदाहरण दिलं आहे. त्या लेखातले आणखी काही विचार पुढे देत आहे.

 मोठे असणे नेहमीच हानिकारक असतं असं नाही. याचं एक उदाहरण हॉल्डेन यांनी दैनंदिन जीवनातलं दिलं आहे, ते असं. आपण आंघोळ केली की अंग पुसण्यापूर्वी आपल्या शरीरावर पाण्याचा बारका थर असतो. त्या पाण्याचे वजन साधारण ४०० ग्रॅम इतकं असतं. माणसाच्या स्वतःच्या वजनाच्या ते एक टक्क्याहूनही कमीच असल्याने त्याला ते जाणवत नाही. पण उंदराला आंघोळ घातली तर? त्याचा पृष्ठभाग मनुष्याच्या पृष्ठभागापेक्षा पुष्कळ कमी असल्याने त्याच्यावर साठलेलं पाणी त्याच प्रमाणात ४०० ग्रॅमपेक्षा कमी असणार. परंतु त्याचे घनफळ माणसाच्या घनफळापेक्षा पुष्कळच कमी असणार. त्यामुळे त्याच्या अंगावर साठलेलं पाणी जवळजवळ त्याच्या स्वतःच्या वजनाइतकं भरतं ! स्वतःच्या वजनाइतकं पाणी अंगावर वाहून नेणं किती त्रासाचे आहे हे प्रत्यक्ष अनुभवाने पाहावं ! उंदरापेक्षा लहान आकाराचा प्राणी पाण्यात बुचकळल्यावर आणखीनच बिकट परिस्थितीत सापडेल. उदाहरणार्थ ओली माशी !

 साधारण ५००० उंदरांचे वजन मनुष्याच्या वजनाइतकं भरेल. ते सर्व उंदीर दिवसभरात किती अन्न खातात आणि श्वासासाठी किती ऑक्सिजन घेतात हे पाहिलं तर ते सामान्य माणसाच्या १७ पटींनी असतं. याचे कारण काय? माणूस शरीराच्या पृष्ठभागातून उष्णता बाहेर सोडतो. आपलं तपमान स्थिर राहण्यासाठी अन्न प्राशन करून त्यातून तो शरीराबाहेर गेलेली उष्णता भरून काढतो. त्यामुळे तो किती खातो हे त्याच्या पृष्ठभाग आणि एकंदर वजन याच्या गुणोत्तरा (Ratio) वर अवलंबून आहे. उंदराच्या बाबतीत हे प्रमाण माणसाच्या १७ पट असतं. (वर दिलेल्या नियमाप्रमाणे १७ X १७ X १७ हे जवळजवळ ५००० आहे है सूज्ञ वाचकांच्या लक्षात आले असेलच) अंग गरम ठेवणं हे मोठा प्राण्यांपेक्षा छोट्या प्राण्यांना अवघड जातं. म्हणून थंड भागात मोठे प्राणी अधिक आढळतात!