पान:Ganitatalya gamatijamati.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४०
गणितातल्या गमती जमती



पश्चिमेकडे गेल्यास सबंध वर्तुळ पूर्ण करून ‘ख’ कडेच परत येतो. आणि तेथून एक मैल उत्तरेस गेल्यावर ‘क’ ला पोचतो. तेव्हा ‘क’ हे ह्या प्रश्नाचे एक उत्तर आहे. शिवाय, एका ऐवजी १२ मैलाच्या परिघाचे अक्षांशाचे वर्तुळ काढून त्यावर कुठेही ‘ख’ घेतल्यास त्याच्या उत्तरेस एक मैलावर ‘क’ असू शकेल. त्याचप्रमाणे १/३, १/४, १/५ मैल इत्यादि परिघांची अक्षांश वर्तुळे पण चालतील.

सूर्याभोवती त्रिकोण :

चित्र क्र. २

 समजा सूर्याभोवती अबक हा तीन सरळ रेषांचा त्रिकोण काढला. त्याच्या तीन कोनांची बेरीज १८०° भरेल का? प्रश्नाचे उत्तर वाटतं तितकं सोपं नाही !

 प्रत्यक्षात अशा सरळ रेषा काढू म्हटलं तर साधन कुठलं ? निश्चितपणे सरळ रेषेत जाणारी एक गोष्ट शास्त्रज्ञाला उपलब्ध आहे - ती म्हणजे प्रकाश. अ, ब आणि ह्या तीन स्थानकांवरून प्रकाशकिरणे एकमेकांकडे सोडायची (पाहा चित्र क्र. २) आणि त्यांच्या मधल्या कोनाचे मोजमाप करून ह्या प्रश्नाचा छडा लावता येईल.

 परंतु एक अडचण येते. सूर्याचं गुरुत्वाकर्षण प्रकाशाला पण आकृष्ट करतं! त्यामुळे चि. क्र. २ मध्ये दाखवल्याप्रमाणे ह्या प्रकाशरेषा किंचित् वाकतात आणि ह्या तीनही कोनांची बेरीज १८०° हून जास्त भरेल !