पान:Ganitatalya gamatijamati.pdf/41

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३६
गणितातल्या गमती जमती आता कल्पना करा, की शाळेत दोन व्रात्य विद्यार्थी होते. आपण त्यांच्या पालकांना A आणि B म्हणू, A ने असा तर्क केला असता.

 'माझ्या माहितीप्रमाणे B चा मुलगा व्रात्य आहे. माझा मुलगा व्रात्य आहे की नाही हे मला ठाऊक नाही. जर तो व्रात्य नसेल तर सबंध शाळेत एकच व्रात्य मुलगा असून त्याला B पहिल्या दिवशीच शिक्षा करेल. आपण वाट पाहू. जर B ने पहिल्या दिवशी त्याच्या मुलाला शिक्षा केली नाही तर माझा मुलगा व्रात्य नाही हा माझा समज चुकीचा ठरेल. आणि मग मी त्याला दुस-या दिवशी शिक्षा करीन.'

 बरोबर हेच विधान B ने स्वतःच्या मुलाबद्दल केलं. त्यामुळे पहिल्या दिवशी हे दोघे वाट पाहात बसले. पहिल्या दिवशी कोणालाच शिक्षा झाली नाही. आणि त्यामुळे आपली मुले व्रात्य आहेत ह्याची दोघांना खात्री पटली. आणि त्यामुळे दुस-या दिवशी दोघा व्रात्य मुलांना चोप मिळाला.

 हाच युक्तिवाद जर शाळेत तीन व्रात्य विद्यार्थी असले तरी लागू होतो. जर त्यांचे पालक A, B आणि C असले, तर प्रत्येकजण असा युक्तिवाद करेल.

 ‘माझ्या माहितीप्रमाणे दोन व्रात्य मुले आहेत. कदाचित माझा पोरगा पण व्रात्य असेल. जर तो व्रात्य नसेल तर दुस-या दिवशी दोघाही व्राव्य मुलांना त्यांचे पालक शिक्षा करतील. तोपर्यंत आपण वाट पाहू. जर तसं झालं नाही तर माझा मुलगा पण व्रात्य ठरणार आणि मी त्याला तिस-या दिवशी शिक्षा करीन.'

 A, B आणि C ह्या तिघांनी हा युक्तिवाद करून दोन दिवस वाट पाहिली आणि तिस-या दिवशी आपल्या पाल्यांचा समाचार घेतला.

 आता त्या व्रात्य मुलांच्या पालकांनी कसा युक्तिवाद केला असेल आणि ते दहाव्या दिवसापर्यंत का थांबले याची कल्पना येईल ! ।