पान:Ganitatalya gamatijamati.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
... तर त्याचं घर कुठे होतं?
३१


म्हणून आकाशातलं तारामंडळ फिरताना दिसतं - फक्त अक्षाच्या दिशेने उत्तरेकडे असलेला ध्रुवतारा स्थिर असलेला दिसून येतो. ह्याच ध्रुवता-याच्या मदतीने समुद्रावरचे खलाशी दिशा ठरवू लागले .....

 पण जर पृथ्वी अक्षाभोवती फिरत नसती तर कुठलेही (पृथ्वीच्या केंद्रातून काढलेल्या) व्यासाच्या टोकावरचे दोन बिंदू आपल्याला ध्रुव म्हणून गृहीत धरून अक्षांश-रेखांश काढता आले असते, आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर दिशा ठरवता आल्या असत्या.

पृथ्वीच्या पृष्ठभागावरची भूमिती :

चित्र क्र. १

 चित्र क्रमांक १ मध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागाची गोलाकार आकृती दाखवली आहे. समजा, एक गृहस्थ उत्तर ध्रुवावरून ग्रीनिच मेरिडियन (०° चा रेखांश) वरून दक्षिणेकडे निघाला. सरळ (दिशा न बदलता) प्रवास करून तो अखेरीस विषुववृत्तापर्यंत पोचला. तेथे तो दिशा बदलून पूर्वकडे निघाला. विषुववृत्तावरून सरळ जाऊन शेवटी तो ९०° च्या रेखांशावर पोचला आणि तेथे त्याने पूर्वेपासून उत्तरेकडे मोर्चा वळवला. ह्या रेखांशावरून सरळ जाऊन तो शेवटी परत उत्तर ध्रुवावरचे जाऊन धडकेल. मात्र त्याची परत येण्याची दिशा त्याच्या निघण्याच्या दिशेशी काटकोन करून असेल.