पान:Ganitatalya gamatijamati.pdf/31

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४
गणितातल्या गमती जमती


पुण्याला जायचं होतं पण रस्त्यांची नावं कुठेच नव्हती. तेव्हा त्याने ह्या घराचे दार ठोठावलं आणि दोघा भावांना प्रत्येकी एकच आणि तोच प्रश्न विचारला. त्यांच्या उत्तरावरून त्याला सांगता आलं की खरं बोलणारा कोण आणि खोटं बोलणारा कोण. शिवाय त्याला पुण्याचा रस्ता कुठला ही पण माहिती मिळाली.

 त्याने विचारलेला प्रश्न कोणता?

(२) राजाने प्रधान कोणाला नेमले?

 एका राजाला प्रधान नेमायचा होता. त्याने हुशार पंडितांना बोलवून सर्वात विचारवान पंडित नेमायचं ठरवलं. निवड करता करता शेवटी तीन पंडित उरले. त्यांची परीक्षा घेण्याकरता त्याने सर्वांना एका टेबलाभोवती बसवलं आणि त्यांचे डोळे बांधून सांगितलं : “तुमच्या प्रत्येकाला कपाळावर लाल किंवा पांढरे गंध लावण्यात येईल. डोळ्यांची पट्टी काढल्यावर तुम्ही एकमेकांकडे पाहा. ज्याला कोणाला दुस-याच्या कपाळावर (एकाच्या किंवा दोघांच्या) लाल गंध दिसेल त्याने हात वर करायचा."

 राजाने प्रत्येकाच्या कपाळावर लाल गंध लावलं. पट्टी काढल्यावर तिघांचे हात वर झाले.

 आता ओळखा पाहू स्वतःच्याच गंधाचा रंग!” राजाने आव्हान दिलं.

 बराच वेळ विचार केल्यावर त्यातल्या सर्वात हुशार पंडिताने सांगितलं, “माझं गंध लाल रंगाचं आहे" त्याला प्रधानकी मिळाली.

 त्याने कुठला युक्तिवाद केला असेल?

(३) हुशार पालक

 एका शाळेत दहा व्रात्य विद्यार्थी होते. प्रत्येकाचे पालक वेगळे होते. अनेक वेळा दम भरूनही हे विद्यार्थी वठणीवर आणायला त्यांच्या मास्तरांना जमलं नाही. ते हेडमास्तरांकडे गेले आणि त्यांनी सर्व परिस्थिती निवेदन केली.

 "हे काम शेवटी पालकांवर सोपवलं पाहिजे. मी सर्वच पालकांना एक नोटीस पाठवतो." हेडमास्तर म्हणाले, त्यांनी शाळेतल्या सर्व