पान:Ganitatalya gamatijamati.pdf/16

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे३. ७ + ८ = किती?

 एक राजा होता. त्याला दोन मुले होती. त्यांना शिकवायला त्याने एका विद्वान पंडिताची नेमणूक केली. काही दिवसांनी त्यांची परीक्षा पाहण्यासाठी राजाने त्यांना बोलावलं. पंडिताने सांगितलं “महाराज, दोन्ही राजपुत्र हुषार आहेत - पण मोठा माझ्या मते अतिशय हुषार आहे.”

 "ठीक आहे, मीच त्यांची परीक्षा घेतो.” राजा म्हणाला. त्याने दोघा राजपुत्रांना एक गणित घातलं.

 "आठ अधिक सात म्हणजे किती?”

 धाकट्याने लगेच उत्तर दिलं, “पंधरा." राजा खूष झाला. त्याने मोठ्याकडे पाहिलं. तो अजून गप्पच होता! अखेर राजाने त्याला उत्तर देण्यास सांगितलं. मोठा राजपुत्र उत्तरला -

 “मी नक्की उत्तर देऊ शकत नाही. पण तुमचा प्रश्न अजून पुरा झाला नाही."

 "म्हणजे? त्यात आणखी काय यायला पाहिजे?”

 "ही बेरीज कोणत्या नियमाखाली करायची?” राजपुत्राचा प्रतिप्रश्न ऐकून राजा गोंधळून गेला. त्याने पंडिताकडे पृच्छा केली. पंडित म्हणाला, हा म्हणतो ते बरोबर आहे ! आठ अधिक सात म्हणजे, नेहमीच पंधरा होत नाहीत. ते नियमावर अवलंबून आहे. नियम बदलले की वेगळं उत्तर येऊ शकेल."