पान:Ganitatalya gamatijamati.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२. सात पूल आणि दोरीची गाठ

 खालील आकृती पेन्सिलीने गिरवता येईल काय? मात्र पेन्सिल एकदा त्या आकृतीवर टेकवली की उचलायची नाही आणि कुठलीही रेषा दोनदा गिरवायची नाही अशी अट. लेखांक १ मध्ये हा प्रश्न विचारला होता.

चित्र क्रमांक १

 या प्रश्नाचे उत्तर असं आहे की, अशा तऱ्हेने ही आकृती गिरवणे शक्य नाही! तुम्ही देखील अनेक प्रयत्न करून हाच निष्कर्ष काढला ना?

 हे विधान गणिताने सिद्ध करता येतं - पण ते प्रमेय अवघड आहे. मात्र त्यामागचा इतिहास मनोरंजक आहे. तो असा :

कोनिग्सबर्गचे सात पूल :

 युरोपच्या नव्हे, पण गणिताच्या इतिहासात गाजलेलं एक लहानसं गाव 'कोनिग्सबर्ग. तिथे नदी होती आणि तिच्यावर सात पूल होते. हे पूल त्या नदीतल्या दोन बेटांना आणि दोन्ही तीरांना एकमेकांशी जोडत होते. त्यांची रचना चित्र क्रमांक २ मध्ये दाखवली आहे.